नागपुरात ७४ लाखांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:32 PM2020-02-05T23:32:19+5:302020-02-05T23:47:27+5:30
गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत बुधवारी वाडी येथील एएमएस ट्रान्सपोर्टमधून ७४ लाख १९ रुपये किमतीचा ६३०६ किलो प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अजय मनोहरराव सोनटक्के (४०) हा एएमएस ट्रान्सपोर्टचा मालक असून महेंद्र रुकमपालसिंग बघेल, उत्तरप्रदेश असे कंटेनर ड्रायव्हरचे नाव आहे. या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये ५९ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ५५६४ किलो प्रीमियम पानमसाला (हॉट) आणि १४ लाख ८३ हजार रुपये किमतीचा ७४२ किलो प्रीमियम च्युइंग टोबॅकोचा (एच५) समावेश आहे. अधिकाऱ्यांनी गोडाऊनला सील ठोकले.
गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्त्वात अधिकारी व पोलिसांनी दुपारी ३.३० च्या सुमारास अमरावती रोड, वाडी येथील गुरुद्वारामागील एएमएस ट्रान्सपोर्टवर धाड टाकली. त्यावेळी दिल्ली नागपूर रोड लाईन्सचा अशोक लेलँड कंपनीच्या एमएच४०-बीएल २४२१ क्रमांकाच्या कंटेनरमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू ट्रान्सपोर्टच्या गोडाउनमध्ये उतरविण्यात येत होता. अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून गुटखा जप्त केला आणि याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचे नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात येणार आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल इंगोले, हवालदार मनोजसिंग चव्हाण, हेड कॉन्स्टेबल प्रवीण फांदाडे, महिला पोलीस छाया राऊत, साधना चव्हाण, ड्रायव्हर प्रदीप समरीश आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम, आनंद महाजन, प्रफुल्ल टोपले आणि नमूना सहायक अमित गवत्रे यांनी केली.
पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री आणि वाहतुकीवर राज्य शासनाने प्रतिबंध लावला असला तरीही शहरात सर्वत्र सहजरित्या उपलब्ध होतो. नागपुरातील ३ हजारांपेक्षा जास्त पानटपऱ्यांवर तंबाखूयुक्त खऱ्र्याची सर्रास विक्री करण्यात येते. विक्रेत्यांवर कारवाई करून पानटपऱ्या सील करण्याची नागरिकांची मागणी आहे.