सीतामढी : बिहारमधील सीतामढीमध्ये एका मुलाने स्वतःच्या आईची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गाठल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आईची तक्रार घेऊन 8 वर्षीय मुलगा जेव्हा येथील शहर नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला, तेव्हा उपस्थित पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. मुलाने रडत रडत आपल्या मारहाणीची कहाणी पोलिसांना सांगितली. आईची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या मुलाचे नाव शिवम कुमार असून तो चंद्रिका मार्केट गल्लीत राहणाऱ्या संदीप गुप्ता यांचा मुलगा आहे.
शिवमने आपल्या आईचे नाव सोनी देवी सांगितले आहे. आपल्या आईबद्दल तक्रार करणारा शिवम हा मुलगा चौथीचा विद्यार्थी आहे. रडत रडत त्याचे बोलणे ऐकून पोलीसही चकित झाले. "पोलीस काका, मम्मी जेवण हिसकावून फेकून देते आणि माझ्या कानात जखमा आहेत, तरीही मम्मीने तिथेच मारहाण केली", असे सांगत शिवमने आपल्या आईवर मारहाणीचा आरोप केला आहे.
याचबरोबर शिवमने आरोप केला आहे की, आई स्वतः जेवण बनवत नाही किंवा कोणाला बनवू देत नाही. तक्रार करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या शिवमने सांगितले की, तो आपली आई सोनीदेवी यांच्याकडे जेवण मागण्यासाठी गेला असता, त्याच्या आईने त्याला मारहाण केली. त्याची आई त्याला वेळेवर जेवणही देत नाही.
दरम्यान, शिवमचे म्हणणे ऐकून एसएचओ राकेश कुमार यांनी त्याला जेवण दिले आणि कारवाईचे आश्वासन देत प्रेमाने समजावून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. यानंतर मुलगाही शांतपणे आपल्या घरी परतला.