साठ कोटी कर्जाच्या आमिषाने बांधकाम व्यावसायिकाला ८० लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 07:16 PM2018-10-16T19:16:18+5:302018-10-16T19:17:11+5:30
या बांधकाम व्यावसायिकाचे येरवड्यातील आळंदी रोड येथे कार्यालय असून पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर येथे गृहप्रकल्प आहे़.
पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या विविध प्रकल्पासाठी ६० लाख रुपयांचे कर्ज खासगी कंपनीकडून मिळवून देतो, असे सांगून रजिस्ट्रेशनसाठी पैसे घेऊन ८० लाख रुपयांचा अपहार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चेन्नई, त्रिवेंदम, कर्नाटकातील अमराविले येथील के़. व्ही़. मधान, ए़. हरी गोपाळकृष्णन, राजकुमार चंद्रशेखरन, ए़ कुमारन व इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
याप्रकरणी संजय मुन्नलाल अगरवाल (वय ५२, रा़ टिंगरेनगर) यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय अगरवाल हे बांधकाम व्यावसायिक आहेत़. त्यांचे येरवड्यातील आळंदी रोड येथे कार्यालय असून पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर येथे गृहप्रकल्प आहे़. या प्रकल्पांसाठी त्यांनी खासगी वित्त संस्थेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांना जून २०१७ मध्ये काही जणांनी संपर्क साधून बांधकाम प्रकल्पांसाठी ६० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे सांगितले़. त्यानुसार त्यांनी त्यांच्याबरोबर करार केला़. कर्ज मिळविण्यासाठी मोबीलायझेशन म्हणून ८० लाख रुपये आगाऊ घेतले़. त्यांनी केलेल्या कराराचे अमराविले येथील सबरजिस्टर कार्यालयात २० हजार रुपये नोंदणी फी भरुन रजिस्टर केले़. त्यानंतर त्यांनी ६० कोटी रुपयांच्या ६० लाखांची प्रॉमेसरी नोट बनवावी लागेल असे सांगितले़.त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या ८० लाख रुपयांतून ते प्रॉमेसरी नोट तयार करणार होते़. यानंतर आपल्याला कर्ज मिळेल, म्हणून ते वाट पहात राहिले़. परंतु, कर्ज न मिळाल्याने त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ पण त्यांचे मोबाईल बंद आढळून आले़. त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर प्रत्यक्षात त्यांनी केवळ १० लाख रुपयांची प्रॉमेसरी नोट बनविली व इतर तीन प्रॉमेसरी नोटची नोंदणी न केली नाही़. तसेच ६० लाख रुपयांचा डी़डी़ न काढता अगरवाल यांच्या ८० लाख रुपयांचा अपहार करुन फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे़. पोलीस निरीक्षक अशोक सायकर अधिक तपास करीत आहेत़.