अमली पदार्थांची तस्करीप्रकरणी ९ नायजेरियन अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 08:05 PM2018-07-28T20:05:18+5:302018-07-28T20:05:59+5:30
पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शखाली ही कारवाई करण्यात आली
मुंबई - अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ९ नायजेरियन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यात १०४ ग्राम कोकेन आणि ०९ग्राम एमडी या अमली पदार्थांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
ईस्टर्न फ्री-वेनजीक असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट रोडवर रात्री सापळे लावून दक्षिण मुंबईच्या दिशेकडे जाणाऱ्या परिसरातून या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून १०४ ग्रॅम कोकेन आणि ९ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ, २ धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी चार्ल्स इफिनी लिजिया (वय-२७, नवी मुंबई), ओकोरो जेम्स आजा (वय-३८, सांताक्रुज, कालिना), मॅसेस जॉन डिनो (वय-३८, नवी मुंबई), सॅम्युअल बाजू ओकेनी (वय-३०, पालघर), केन कोण इसमेल (वय-३८, दिवा), कोफी जेम्स रोमालिक (वय-३०, अंधेरी), चिकू फ्राय (वय-४३, मालवणी, मालाड), नाना हरिसेन्स अगवू (वय-२८, मालवणी, मालाड), जोको हुमाई वाचुकू पैस (वय-३२, विरार ) या आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडे त्यांचे पासपोर्ट नसल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नुकताच पोलिसांवर भायखळा परिसरात नायजेरियन टोळीने जीवघेणा हल्ला केला होता. त्याप्रकरणी देखील या आरोपीचे काही लागेबांधे आहेत का? याची चौकशी करणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.
पोलिसांवर नायजेरियन टोळीने कसा केला होता हल्ला.....वाचा अधिक
http://www.lokmat.com/crime/police-dying-die-nigerian-police-firing-police/