तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ९० हजार उकळणारा जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:38 AM2019-08-29T11:38:42+5:302019-08-29T11:39:43+5:30
आरोपीने तरुणीला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी केली.
पिंपरी : इव्हेंटमध्ये काम देण्याचे आमिष दाखवत तरुणीचे फोटो मागवून घेतले. त्यानंतर ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीकडून ९० हजार रुपये उकळले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेंद्र सिंह मॅथॉन (वय २३, रा. कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही २३ वर्षांची असून खासगी कंपनीत नोकरी करते. आरोपी विरेंद्र मॅथॉन याने फिर्यादी तरुणीशी तीन महिन्यांपूर्वी ओळख केली. तरुणीचा विश्वास संपादन करून तिला इव्हेंटमध्ये काम देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आरोपीने तरुणीकडून तिचे फोटो मागून घेतले. तरुणीने आरोपीला फोटो दिले. त्यानंतर आरोपीने तरुणीला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिच्याकडे पैशांची मागणी केली. आरोपीने तरुणीकडून रोख रक्कम तसेच तरुणीच्या एटीएमद्वारे ९० हजार रुपये जबरदस्तीने घतेले. त्यानंतर आरोपीने तरुणीच्या मोबाईलवर अश्लील मेसेजही पाठविले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.