लाच घेण्यात पोलीस विभागचं अव्वल, कोरोना काळातही सव्वा महिन्यात 92 एसीबी ट्रॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 10:56 PM2021-02-14T22:56:51+5:302021-02-14T22:58:11+5:30
१२६ आरोपींचा समावेश : अपसंपदा अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद नाही
संदीप मानकर
अमरावती - लॉकडाऊनमध्ये एसीबी ट्रॅपमध्ये घट झाली होती. पण, अनलॉकमध्ये पुन्हा शासकीय कार्यालयाचे कामकाज पूर्ववत झाल्यामुळे कोरोनाकाळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ होऊ लागली. राज्यात ४२ दिवसांत ९२ एसीबी सापळे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे दरदिवशी दोन किंवा तीन सापळे यशस्वी होत आहेत.
९२ ट्रॅपमध्ये १२६ आरोपींविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे. मात्र, ९२ ट्रॅपमध्ये एकही अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचा एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही, हे विशेष!
या विभागात झाले ट्रॅप
सव्वा महिन्यात सर्वाधिक ट्रॅप हे राज्यात पुणे विभागात झाले. या विभागात २३ ट्रॅपमध्ये २९ आरोपींना अटक करण्यात आली.
मुंबईत २, ठाण्यात ७, पुण्यात २३, नाशिक येथे १७, नागपूर येथे १२, अमरावती येथे १०, औरंगाबाद येथे १५, नांदेड येथे ६ ट्रॅप यशस्वी झाले.
पाच वर्षांत साडेचार हजार ट्रॅप
प्रकरणे वर्ष २०१६ ,२०१७, २०१८, २०१९, २०२०
सापळा - ९८५, ८७५, ८९१, ८६६, ६३०
अपसंदपदा - १७, २२, २२, २०, १२
अन्य भ्रष्टाचार १४, २८, २३, ५, २१
एकूण गुन्हे १०२६, ९२५, ९३६, ८९१, ६६३
लाच घेण्यात पोलीस विभाग अव्वल
राज्यात सव्वा महिन्यात ९२ ट्रॅप झाले यात लाच खाण्यात पोलीस विभागाच अव्वल असून, यामध्ये १९ ट्रॅप यशस्वी झाले. दुसरा क्रमांक हा महसूल विभागाचा असून, १६ ट्रॅप यशस्वी झाले. महावितरणमध्ये १४ ट्रॅप, तर महानगरपालिका ६, पंचायत समिती ७ ट्रॅप यशस्वी झाले. ९२ ट्रॅपममध्ये १ कोटी ८४ लाख ६२ हजारांची रक्कम आरोपीकडून लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जप्त केली आहे.