नवी दिल्ली: परदेशातून भारतात सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध मार्गांचा अवलंब करतात. मात्र तरीही सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे तस्कर पकडले जातात. सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी तस्करांकडून नवनवे मार्ग शोधले जातात. विमानतळावर अवैध सोनं पकडलं जाऊ नये यासाठी नव्या क्लृप्त्या वापरण्यात येतात. मात्र तरीही तस्कर पकडले जातात आणि त्यांची रवानगी कारागृहात होते. अनेकदा तस्करीसाठी वापरले जाणारे फंडे पाहून सुरक्षा कर्मचारी चक्रावून जातात.
२८ ऑगस्टला नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेली घटना आज उघडकीस आली आहे. विमानतळावर तैनात असलेल्या एअर इन्टेलिजन्स युनिटच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी उझबेकिस्तानच्या २ नागरिकांना अटक केली. ते ९५१ ग्रॅम सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. ग्रीन चॅनेलच्या माध्यमातून ते दुबईहून भारतात आले होते.
सोन्याच्या तस्करी करण्यासाठी उझबेकी नागरिकांना भलताच मार्ग शोधून काढला होता. अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी त्यांनी ९५१ ग्रॅम सोनं तोंडात फिट केलं होतं. कृत्रिम दातांच्या माध्यमातून आणि दातांच्या शेजारी असलेल्या जागेत चेनच्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्याचा दुकलीचा प्रयत्न होता. मात्र सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी त्यांची झडती घेतली. त्या दरम्यान तस्करांचा अफलातून फंडा अधिकाऱ्यांच्या लक्षात आला.