आपण आतापर्यंत एखाद्या तरुणाने मुलीवर बलात्कर केल्याच्या घटना ऐकल्या अथवा वाचल्या असतील. मात्र मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर न्यायालयाने पहिल्यांदाच एका तरुणीला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी तरुणीने फसवणूक करत अल्पवयीन तरुणाला गुजरातला नेले होते आणि तेथे त्याच्यासोबत अनेक वेळा बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर 2018 रोजी एका महिलेने इंदूरमधील बाणगंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधित महिलेचा 15 वर्षांचा मुलगा 3 नोव्हेंबर 2018 रोजी जवळच्याच दुकानावर दूध आणण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. संबंधित महिलेने आपल्या मुलाचा जवळपासच्या नातलगांकडेही शोध घेतला. मात्र त्याचा तपास लागला नाही. यानंतर संबंधित महिलेने, आपल्या मुलाचे फूस लावून अपहरण केल्याची शक्यता व्यक्त करत, त्याला शोधण्यासाठी पोलिसांत धाव घेतली होती. यानंतर, पोलिसांनी बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेतला. तेव्हा त्याच्यासोबत एक तरुणीही पकडली गेली होती.
मुलाचा फोनही स्वतःकडेच ठेवायची तरुणी - पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले, राजस्थानमधील एका 19 वर्षीय तरुणीने फसवणूक करून त्याला गुजरातमध्ये नेले. या ठिकाणी तिने त्याला टाइल्स बनविण्याच्या कारखान्यात कामाला लावले. पीडित मुलाने सांगितले की, संबंधित तरुणी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याला भाग पाडत होती. महत्वाचे म्हणजे, मुलाला आपल्या घरच्यांसोबत संपर्क साधता येऊ नये म्हणून, तिने मुलाचा मोबाईल फोनही आपल्याजवळच ठेवला होता.
पीडित मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी मुलीला अटक करत तिच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली असता मुलीवरील आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात, जिल्हा अभियोग अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी सांगितले की, संबंधित आरोपी तरुणीने अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून गुजरातला नेले आणि एका कंपनीत कामाला लावले. मुलगी त्या मुलासोबत भाड्याच्या घरात राहायची आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायची. जिल्हा अभियोक्ता अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉक्सो कायद्यांतर्गत मुलीला शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.
न्यायालयाने सुनावली अशी शिक्षा -न्यायालयाने 15 मार्च रोजी याप्रकरणी निकाल देताना दोषी मुलीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यासोबतच पीडित तरुणीला ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिफारसही न्यायालयाने सुनावली आहे.