लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चीनवरून आयात होणाऱ्या स्टेशनरी उत्पादनांची किंमत कमी दाखवत तब्बल आठ कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका ठेवत केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी डोंबिवली येथील एका व्यापाऱ्याला अटक केली आहे. राजेश वैष्णव असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून या प्रकरणी त्याच्या भिवंडी येथील गोडाऊनवरदेखील डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.
उपलब्ध माहितीनुसार, संबंधित व्यापाऱ्याचा स्टेशनरी मालाचा व्यवसाय असून तो प्रामुख्याने चीन येथून गेल्या पाच वर्षांपासून मालाची आयात करत आहे. सामानाच्या खरेदीचे जे चलन बनविण्यात येत होते ते चलन वैष्णव स्वत:च बनवत असे. ते चलन चिनी कंपनीला पाठवून त्यांच्याकडून त्यावर त्याला स्टॅम्प करून ते पाठविण्यात येत होते. मूळ खरेदीच्या ४० ते ५० टक्के इतकीच रक्कम या चलनवर नमूद केलेली असे. यामुळे त्याला आयात केलेल्या मालावर कमी शुल्क भरावे लागले.
पाच वर्षांत बुडविला करगेल्या पाच वर्षांत मिळून त्याने अशा पद्धतीने केलेल्या व्यवहारांमुळे सरकारचा आठ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका डीआरआयने त्याच्यावर ठेवला आहे. तर, या मालाचे उर्वरित पैसे तो हवालाच्या मार्गाने संबंधित चिनी कंपनीला पाठवत असल्याचे डीआयआरच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक पडताळणीमध्ये दिसून आले आहे.