रवींद्र चांदेकर/वर्धा: वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना समुद्रपूर येथे शुक्रवारी १५ रोजी घडली. वैशाली सुभाषराव कुरवाळे (४४, रा. नागपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून मृतकाचा भाऊ, भावजय यांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजू रमेश डगवार यांचे वडील रमेश डगवार यांचे ६ महिन्यांअगोदर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना ४ मुली व एक मुलगा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मोठी बहीण वैशालीसह तीन बहिणी व भाऊ राजू यांच्यात वडिलांच्या संपत्तीवरून वाद सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी १५ मार्चला वैशाली सुभाष कुरवाळे (४४, रा. जोशीनगर, नागपूर) या घरी मॉर्निंग वॉकला जातो, असे सांगून समुद्रपूर येथे माहेरी भावाच्या घरी पोहोचल्या. सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास तिने भावाच्या घरी असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. संपत्तीच्या वादातून वैशालीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मृत महिलेचे पती सुभाष कुरवाळे व मुलाने वैशाली हिच्या मृत्यूला भाऊ राजू डगवार व त्याची पत्नी व राजूचे सासरे कारणीभूत असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून भाऊ आणि भावजय हिला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे.
रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संतोष शेगावकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. मृतदेह विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. रुग्णालयात नातेवाइकांचा संताप वाढून परिस्थिती चिघळताना पाहून या स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारी म्हणून ठाणेदार संतोष शेगावकर यांनी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात केला. दंगलग्रस्त पथकसुद्धा बोलावण्यात आले होते. मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करीत मृत महिलेचा भाऊ राजू रमेश डगवार व त्याची पत्नी यांना अटक केली आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप गाडे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.