ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेस अटक, गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: March 10, 2023 09:55 PM2023-03-10T21:55:33+5:302023-03-10T21:55:45+5:30
बनावट गिऱ्हाईक पाठविल्यानंतर काही रुपयांमध्ये महिलेला शरीरविक्रय करण्यासाठी त्या ठिकाणी आणण्यात आले होते.
ठाणे : पैशांचे प्रलोभन दाखवून महिलेकडून शरीरविक्रय व्यवसाय करून घेणाऱ्या मुंबईतील मालाडमधील २२ वर्षीय महिला दलालास अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दिली. या महिलेच्या तावडीतून ४१ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
कोपरीतील आनंद टॉकीजजवळ महिला तिच्या मुकुंद नामक साथीदारासह सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना मिळाली होती. त्याआधारे पथकाने ९ मार्चला सापळा लावला. बनावट गिऱ्हाईक पाठविल्यानंतर काही रुपयांमध्ये महिलेला शरीरविक्रय करण्यासाठी त्या ठिकाणी आणण्यात आले होते.
या गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी छापा मारून दलाल महिलेला अटक केली. तिच्याकडून एक हजार रुपये, मोबाइल आणि इतर सामग्री असा सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी महिलेच्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.