ठाणे : मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करताना झांशी रेल्वेस्थानकात फिरोजपूर एक्स्प्रेसमधून अपहृत मुलीस पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलीस मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
२१ जानेवारी रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याबाबत तिच्या पालकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार अल्पवयीन अपहृत मुलीचा व अज्ञात आरोपीचा शोध गुन्हे शाखा, घटक-१ करीत असताना पोलीस हवालदार आबुतालीब शेख यांना अपहृत मुलगी ही फिरोजपूर ए दिल्ली येथे जात असल्याची माहिती मिळाली. तिला फूस लावून पळवून नेणारा इसम हा सदर मुलीला दिल्ली येथे भेटणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा घटक- १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू करण्यात आले.
पोलीस हवालदार आनंदा भिलारे यांनी झांशी रेल्वे पोलीस ठाणे इन्चार्ज सुनीलकुमार सिंग यांना घटनेची माहिती देत, अपहृत मुलीचा गाडीमध्ये शोध घेण्यास सांगितले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकड व पथक झांशी येथे रवाना करण्यात आले. झांशी रेल्वे पोलीस ठाण्याचे सुनीलकुमार सिंग व त्यांच्या पथकाने फिरोजपूर एक्स्प्रेस ट्रेन झांशी रेल्वेस्थानक येथे २२ जानेवारी रोजी थांबवून अपहृत मुलीस ताब्यात घेतले.