लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत रस्त्यावर झोपणाऱ्या चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करत त्याची विक्री तेलांगणातील डॉक्टरमार्फत केली होती. पुरावा नसतानाही बाळाची सुखरूप सुटका जुहू पोलिसांनी करत मंगळवारी तिघांना अटक केली. यासाठी पोलीस आयुक्तांनीही त्यांचे कौतुक केले.जुहू ११ नोव्हेंबर, २०२० रोजी रस्त्यावर राहणाऱ्या दाम्पत्याची तक्रार मिळाली होती. त्यांचे अवघ्या चार महिन्यांचे बाळ चोरून नेल्याचे पोलिसांना समजले. परिमंडळ ९चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार व गणेश तोडकर यांनी दिवसरात्र तांत्रिक तपास करुन तेलंगणातील डॉक्टर मोहम्मद बशिरुद्दीन (४६), मुंबईत बाळाचे अपहरण करणारे महेश डिट्टी (३८), रिक्षाचालक महेश व्यंपटी (४२) यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि बाळाला सुखरूप सोडविण्यात पोलिसांना यश मिळाले.
चार लाखांना विकले बाळमूल नसलेले एक दाम्पत्य एखाद्या अनाथ मुलाच्या शोधात असताना डॉ. बशिरुद्दीनने त्यांच्याकडून चार लाख रुपये घेत त्यांना बाळ मिळवून देण्याचे सांगितले. त्यानंतर अन्य दोघांच्या मदतीने बाळाचे अपहरण केले.- पंढरीनाथ व्हावळ, जुहू पोलीस ठाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक