खळबळजनक! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे अपहरण; १८ दिवस सामूहिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:35 AM2020-11-15T05:35:35+5:302020-11-15T05:40:05+5:30
Crime News : मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लावला. सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मॉर्निंग वॉकला गेलेल्या सटाणा येथील वीस वर्षीय विवाहितेचे अपहरण करून चार नराधमांनी तब्बल अठरा दिवस सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी मुळाणे येथील चौघांना अटक केली आहे.
शहरात केळी विक्रीचा व्यवसाय करणारी महिला २१ ऑक्टोबरला सकाळी भाक्षी रोडला मॉर्निंग वॉकला जात असताना भाक्षीच्या खंडेराव महाराजांच्या गडाजवळ मुळाणे येथील सचिन तानाजी खेताडे (३२), भगवान गवळी (३८),पप्पू बंडू नाडेकर (३६) ,संदीप भावडू नाडेकर (४०) यांनी अडविले. त्यानंतर मोटारसायकवर दोधेश्वरच्या जंगलात पळवून नेले. तेथे त्यांनी विवाहितेला दररोज जबरदस्तीने मद्य पाजून सामुहिक अत्याचार केला. ८ नोव्हेंबरला महिलेने चौघांना विश्वासात घेऊन दमण येथे माहेरी जाण्याची व्यवस्था करून द्या, अशी विनंती करत स्वत:ची सुटका करून घेतली.
असा लागला छडा...
मुळाणे येथील चौघा नराधमांनी अत्याचार केल्यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरने या प्रकरणाचा छडा लावला. सासरच्यांनी महिलेचा शोध सुरू केला होता. अचानक माहेरच्या मंडळींनी मुलगी आल्याची माहिती दिली. सटाण्याला सासरी आल्यावर पीडितेने, आपले अपहरण करून अत्याचार केल्याचे कथन केले. त्यावेळी दिलेला मोबाइल नंबर व अत्याचार केल्याचे ठिकाण याची पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून माहिती घेतली आणि जंगलातील त्या झोपडीवर छापा टाकला. या छाप्यात मद्याच्या बाटल्या व आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. त्यानंतर चौघांच्या घरांवर छापे टाकून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, १६ नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.