'' प्रिस्क्रिप्शन'' शिवाय ऑनलाइन मिळतात गर्भपाताची औषधे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:57 PM2019-07-24T14:57:39+5:302019-07-24T15:07:25+5:30
गर्भपाताची औषधे संबंधित नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी घेऊनच द्यावीत. तसेच एक चिठ्ठी औषध विक्रेत्याने स्वत:कडे राखून ठेवणे आवश्यक आहे.
पिंपरी : ड्रग अँड कॉस्मॅटिक अॅक्टनुसार ई-फार्मसीसाठी परवानगी नाही. असे असतानाही ऑनलाइन औषध विक्रेत्यांकडून कायद्याचे उल्लंघन करण्यात येत आहे. ' प्रिस्क्रिप्शन ' असल्याशिवाय औषध देण्यास बंदी आहे. त्यात गर्भपाताची औषधे संबंधित नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी घेऊनच द्यावीत. तसेच एक चिठ्ठी औषध विक्रेत्याने स्वत:कडे राखून ठेवणे आवश्यक आहे. ग्राहकास दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्रतीवर औषधाची पूर्ण माहिती लिहून त्यावर दुकानदाराचा शिक्का व सही असते.. मात्र या नियमाला बगल देत ऑनलाइन विक्रेत्यांकडून गर्भपाताची औषधे चिठ्ठी नसतानाही वितरीत केली जात आहेत.
गर्भपाताची औषधी शरीरावर दुरगामी परिणाम करतात. त्यामुळे नोंदणीकृत व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तसेच त्यांची चिठ्ठी असल्याशिवाय औषध विक्री करता येत नाही. असे करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही गर्भपातासाठी अनवॉन्टेड किट सहज उपलब्ध होत आहे. त्यासाठी अनेक वेबसाईटचा वापर केला जातो. या माध्यमातून हे कट नलाइन उपलब्ध होते. नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी न घेताच ऑनलाइन विक्रेते या 'किट' ची विक्री करीत आहेत.
पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी एका वेबसाईट वरून गर्भपाताची औषधे मागविली होती. त्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही संबंधित ऑनलाइन औषध विक्रेत्याकडून गर्भपाताची औषधे (अनवॉन्टेड किट) सहज उपलब्ध झाले. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनतर्फे अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. संबंधित वेबसाईट व ऑनलाइन औषध विक्रेत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या निवेदनातू केली आहे.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे देण्यासाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. मात्र, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटवरून ही औषधे राजरोसपणे सहज उपलब्ध होत आहेत. याचा संबंधित महिलांच्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी यापासून सावध राहावे.
- विवेक तापकीर, उपाध्यक्ष, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन
................
ऑनलाइन पध्दतीने औषध विक्री केलेल्या संबंधित वेबसाईटची कंपनी, उत्तर प्रदेशातील डीबई येथील संबंधित औषध विक्रेता यांना पत्र पाठविले आहे. तसेच औषधांच्या संबंधित कंपन्यांनाही पत्र पाठविले आहे. अशा पध्दतीने औषध विक्री करणे बेकायदेशीर असतानाही औषध विक्री होत असल्याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेशातील औषध नियंत्रकांनाही पत्र पाठविले आहे.
- एस. बी. पाटील, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग
अज्ञात विक्रेत्यांविरोधात गुन्हा
गर्भपाताची औषधे ऑनलाइन विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनच्या परिमंडळ तीनच्या औषध निरीक्षक भाग्यश्री अ. यादव (वय ४२, रा. धनकवडी, पुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील डिबई येथील एक औषध विक्रेता व एका वेबसाईट विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक मल्हारी तापकीर (रा. काळेवाडी) यांनी गर्भपाताच्या औषधांची मागणी केली होती. डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन नसतानाहीनलाइन औषधे त्यांना मिळाली. सही व शिक्का असतो. मात्र या नियमाला बगल देत ऑनलाइन विक्रेत्यांकडून गर्भपाताची औषधे चिठ्ठी नसतानाही वितरीत केली जात आहेत.