अबब...२ कोटी रुपयांचे हेरॉईन नायजेरियनच्या पोटातून सापडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 09:02 PM2018-08-23T21:02:54+5:302018-08-23T21:04:09+5:30
पोटातून हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल आणि सामानात लपवलेल्या २९ कॅप्सूल सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे.
अहमदाबाद - अमली पदार्थांची तस्करी करण्याप्रकरणी अहमदाबाद विमानतळावर एका नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. जोहू अॅलेक्सिस असे त्याचे नाव असून तो दुबईहून अहमदाबाद व अहमदाबादहून मुंबईला निघाला होता. त्याच्या पोटातून हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल आणि सामानात लपवलेल्या २९ कॅप्सूल सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे.
भारतातील अनेक ठिकाणी अगोदर अनेकदा अशाच पद्धतीने आपण अमली पदार्थांची तस्करी केल्याची कबुली त्याने दिली आहे. यावेळी मात्र आपण तपास अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडलो असंही त्याने सांगितले. जोहू दुबईहून अहमदाबाद व तेथून मुंबईला जात होता. परंतु, विमानतळावरील सुरक्षा तपासणीच्या वेळी स्कॅनरमधून जाताना त्याच्या पोटात संशयित वस्तू असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीसांनी जोहूला सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यावेळी डॉ़क्टरांनी त्याला पोट साफ करण्याचे औषध दिले. त्यानंतर त्याच्या शौचात हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल सापडल्या. नंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.