संजय पाठक
नाशिक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अनुद्गार काढल्या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिक मध्ये रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटात अलीकडे दाखल झालेले आणि सध्या युवा सेना विस्तारक तथा लोकसभा संपर्क प्रमुख योगेश बेलदार यांनी यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी रात्री 12 वाजेच्या सुमारास खासदार राऊत यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. खासदार संजय राऊत यांनी विवारी सकाळी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी अपशब्द वापरले होते. महाराष्ट्रात यापूर्वी इतकी चाटुगिरी कधी झाली नव्हती इतकी सुरू आहे. यासह अनेक आक्षेपार्ह शब्दप्रयोग त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वापरले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील या विधानांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण झाल्यामुळे आपण ही तक्रार करत असल्याचे योगेश बेलदार (रा मखमलाबाद) यांनी तक्रारी म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.