एसीबीची कारवाई! तलाठ्याला प्रलोभन देणारे बिल्डर, ब्रोकर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 09:06 PM2020-10-23T21:06:39+5:302020-10-23T21:10:02+5:30

ACB trap :  १० हजारांच्या लाचेची तजवीज

ACB action! Builders, brokers arrested for luring Talathi | एसीबीची कारवाई! तलाठ्याला प्रलोभन देणारे बिल्डर, ब्रोकर ताब्यात

एसीबीची कारवाई! तलाठ्याला प्रलोभन देणारे बिल्डर, ब्रोकर ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्दे एसीबीने सापळा रचून दोघांनाही शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे तलाठ्याचे कौतुक होत आहेत.

अमरावती : पडीक शेतीचे काम करून देण्याकरिता तलाठ्याकडे आलेल्या एका बिल्डरसह इस्टेट ब्रोकरने १० हजारांच्या लाचेचे प्रलोभन दाखविले. त्याला बळी न पडता तलाठ्यानेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हवाली केले. ही कारवाई अमरावती येथे बियाणी चौकात राहुल पान सेंटरसमोर शुक्रवारी दुपारी करण्यात आली.  
एमडीएम बिल्डर अँड डेव्हलपर्स प्रा.लि.चा संचालक शंकरलाल महेशकुमार आहुजा (३३, रा. आहुजा फ्लोअर मिलजवळ, रामपुरी कॅम्प) आणि शेती व प्लॉट ब्रोकर विजय बाबाराव चव्हाण (५०, रा. संगीतानगर, सोनल कॉलनी) अशी अमरावती येथील आरोपींची नावे आहेत. तलाठी संतोषसिंग गिल (५१, रा. अमरावती) यानी एसीबीकडे तक्रार नोंदविली. ते तिवसा तालुक्यातील वऱ्हा सांझा क्रमांक २१ चा कारभार सांभाळतात, शिवाय सालोरा बु. सांझा क्रमांक ३ येथील अतिरिक्त प्रभार आहे.

आरोपी शंकरलाल आहुजा व त्याच्या कुटंबीयांच्या नावावर असलेल्या मौजा सालोरा बु. येथील पडीक शेतजमिनीच्या सात-बारामधील गाव नमुना १२ मध्ये सन २०२०-२०२१ मध्ये कापूस या पिकाची नोंद करून बेकायदेशीर कृत्य करण्याकरिता २२ आॅक्टोबर रोजी सांझा कार्यालय वऱ्हा येथे पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष आरोपी आहुजा याने तक्रारदार तलाठी यांना १० हजार रुपयांच्या लाचेचे प्रलोभन दिले. त्यास आरोपी चव्हाण यानेसुद्धा लाचेचे प्रलोभन देऊन आरोपी आहुजा याला सहकार्य केले. त्यावर एसीबीने सापळा रचून दोघांनाही शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे तलाठ्याचे कौतुक होत आहेत.

 
एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल तसरे, नायब पोलीस शिपाई विनोेद कुंजाम, वैभव जायले, सुनील जायेभोये, चालक सतीश किटुकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Web Title: ACB action! Builders, brokers arrested for luring Talathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.