अनलॉकच्या काळात लाचखोरीला वेग, २१७ जण जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:19 AM2020-09-05T03:19:43+5:302020-09-05T03:19:56+5:30
जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील लाचखोरीला लागलेला ब्रेक अनलॉकच्या काळात फेल झाल्याने लाचखोरीने पुन्हा वेग घेतला आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेली कारवाई (एसीबी) एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत चार पटीने वाढली आहे.
जानेवारी ते आॅगस्ट महिन्यापर्यंत लाचखोरीप्रकरणी ३९८ सापळा कारवाईत ५४७ जणांना अटक करण्यात आली. मार्च महिन्यात ५८ गुन्ह्यांच्या कारवाईत ८६ जणांना अटक करण्यात आली, तर एप्रिलमध्ये ७ सापळा कारवाईत ९ जणांना अटक झाली.
मे महिन्यात ३० कारवायांत ४३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. १ जूनपासून देशात अनलॉकचा टप्पा सुरू झाला आणि लाचखोरीलाही वेग आला. जूनमध्ये कारवाईचा आकडा ६४ वर गेला. तर जुलैमध्ये ५६ तर आॅगस्टमध्ये ४३ वर गेला. या तीन महिन्यांच्या कारवाईत २१७ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कारवाई ४७ ने कमी आहे.
येथे करा तक्रार
लाच स्वीकारणे जसा गुन्हा आहे, तसा देणेदेखील गुन्हा आहे. त्यामुळे कोणीही लाच मागत असेल, त्याबाबत एसीबीच्या १०६४ या हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.