आरमोरी (गडचिरोली) - वीटाभट्टीचा परवाना मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आरमोरीच्या तहसीलदारालालाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या परिसरात करण्यात आली. यशवंत तुकाराम धाईत (५५) असे त्या तहसीलदाराचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारकर्त्या व्यक्तीने आरमोरी तहसीलदारांकडून वीटाभट्टीच्या परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही परवाना देण्यासाठी त्यांना ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. त्यामुळे संबंधित अर्जदाराने गडचिरोली एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार सापळा रचण्यात आला. त्यात तहसीलदार धाईत यांना पंचांसमक्ष ५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (नागपूर), अपर अधीक्षक राजेश दुधलवार, उपअधीक्षक शंकर शेळके, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनात पो.निरीक्षक रवी राजुलवार, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नायक सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सोनी तावाडे, सोनल आत्राम, चालक तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली.