दरोड्यातील १९ वर्षे फरारी आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 04:27 PM2019-08-14T16:27:52+5:302019-08-14T16:29:18+5:30
कोयत्याने वार करुन सोन्याच्या व्यापाऱ्याला होते लुटले
पुणे : पुण्यात येऊन सोने विकून परत मुंबईला जात असताना व्यापाºयावर कोयत्याने वार करुन दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीपैकी एकाला तब्बल १९ वर्षांनंतर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़. राजू जगन्नाथ गायकवाड (वय ४५, रा़ दिवे, ता़ पुरंदर) असे त्याचे नाव आहे़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, इंदरमल जैन (वय ४२, रा. परळ, मुंबई) हे २२ मार्च २००० रोजी हे सोने विक्रीसाठी मुंबईहून पुण्यात आले होते़. व्यापाºयांना सोने विकल्यानंतर ते रात्री पावणे आठच्या सुमारास जमा झालेले पैसे घेऊन रिक्षाने पुणे स्टेशनला जात होते़. त्यावेळी रास्तापेठ येथील ताराचंद हॉस्पिटलच्या समोर काही जणांनी रिक्षा अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून चॉपर व कोयत्याने वार केला़. त्यांच्याकडील १ लाख ८६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने पळून नेली होती़. याप्रकरणी त्याचे भागीदार अशोककुमार जैन (रा़. काळा चौकी, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन समर्थ पोलिस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील काही जणांना पोलिसांनी अटक केली होती़. मात्र, राजू गायकवाड हा पोलिसांना गुंगारा देत होता़
गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकातील कर्मचारी हद्दीत गस्तीवर असताना अमोल पवार यांना बातमी मिळाली की, अनेक दिवसापासून एका गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गायकवाड हा कनक हॉटेलच्या समोर शंकरशेठ रोडवर उभा आहे. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजू गायकवाड सांगितले. तसेच त्याच्याकडे समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत विचारले असताना त्याने व्यापाऱ्याला लुटल्याची कबुली देत तो गुन्हा केल्यापासून फरार असल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अरुण वायकर, उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, कर्मचारी योगेश जगताप, अमोल पवार, वैभव स्वामी, अजय थोरात, अनिल घाडगे यांच्या पथकाने केली.