प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: देवदर्शनाच्या बहाण्याने प्रसादाच्या पेढयात गुंगीचे औषध टाकून रिक्षाचालकाला लुटण्याची घटना फेब्रुवारीमध्ये पश्चिमेकडील विष्णुनगर हद्दीत घडली होती. या दोघा भामटयांना मिरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेथील एका गुन्हयात अटक केली असून त्यांचा ताबा विष्णुनगर पोलिसांकडे दिला आहे. सागर महेंद्रभाई पारेख (वय ३१) आणि संपतराज गेवेचंद जैन ( वय ४८ ) दोघेही राहणार गुजरात अशी अटक आरोपींची नावे आहेत.
डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा परिसरात राहणारे राकेश म्हामूणकर हे रिक्षाचालक आहेत. ८ फेब्रुवारीला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास रेल्वे स्टेशन मच्छी मार्केट परिसरात असताना दोन जणांनी त्यांची रिक्षा थांबविली आणि शहाड येथील बिर्ला मंदिर येथे जायचे असल्याचे सांगितले. राकेश यांनी दोघांना रिक्षात बसवले आणि त्यांना बिर्ला मंदिर येथे नेले.
मंदिरात दर्शन घेवून हे दोघे पुन्हा राकेश यांच्या रिक्षात बसले व त्यांनी राकेशला प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. पण त्या पेढयामध्ये गुंगीचे औषध टाकले असल्याने तो खाताच राकेश यांना गुंगी येऊन ते बेशुध्द पडले. त्यावेळी रिक्षातील दोघांनी राकेश यांच्या गळयातील सोन्याची चेन, मोबाईल आणि रोकड असा ८५ हजाराचा मुद्देमाल लुबाडून पोबारा केला. दोघांनी राकेश यांची रिक्षा डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातून केल्याने राकेश यांनी शुध्दीवर येताच विष्णुनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
सोन्याची चेन घालणाऱ्या रिक्षाचालकांना ते करायचे टार्गेट
एप्रिल महिन्यात मीरा- भाईंदर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सागर व संपतराज यांना अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली होती. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी फेब्रुवारी महिन्यात डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाला पेढ्यात गुंगीचे औषध देऊन लूट केल्याची माहीती दिली. यावर संबंधित पोलिसांनी विष्णुनगर पोलिसांशी संपर्क करून दोघांचा ताबा त्यांच्याकडे दिला. या आरोपींविरोधात नयागर, काशिमिरा, खडकपाडा बांद्रा आणि आंबोली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. सोन्याची चेन घालणा-या रिक्षाचालकांना दोघे टार्गेट करायचे. गुन्हा करताना लांबच भाडे ही ट्रीक ते वापरायचे असेही तपासात समोर आले आहे.