मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडीचे अधिकारी व व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नवलानीविरोधात गुरुवारी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नवलानीने ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने आतापर्यंत सुमारे ५९ कोटी रुपयांची रक्कम उकळल्याची बाब एसीबीच्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, एसीबीकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. त्यावेळी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून २०१५ ते २०२१ या कालावधीत नवलानीने ५८ कोटी ९६ लाख ४६ हजार १०८ रुपये एवढी रक्कम घेतल्याचे निष्पन्न झाले. या रकमा नवलानी याने स्वतःच्या नावाने, तसेच बनावट शेल कंपन्यांच्या नावाने असुरक्षित कर्ज व सल्लागार शुल्क या स्वरूपात घेतली होती. या रकमा नवलानीने ईडी
अधिकाऱ्याला त्यांचे कर्तव्य करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अथवा तसे भासवून स्वीकारल्याचे तपासात निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी नवालानी व इतर विविध कंपन्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ८ व कलम ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नवलानीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
राऊतांचे आरोप... संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानुसार, केंद्रीय यंत्रणा ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवत आहे. त्यात व्यावसायिक जितेंद्र नवलानीसह ईडीच्या अधिकाऱ्यांवर काही कंपन्यांकडून पैसे उकळले होते. याप्रकरणी अरविंद भोसले यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली, तसेच तक्रारीबरोबर त्या कंपन्यांची यादीही देण्यात आली होती. त्यानुसार, तपास सुरू आहे.