कोराडी खून प्रकरणातील आरोपीला हिंगणघाटात बेड्या; रक्ताने माखलेले दोन सिमकार्ड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 09:22 PM2022-08-20T21:22:47+5:302022-08-20T21:26:32+5:30

दोन जिगरबाज कर्मचाऱ्यांची कामगिरी...

Accused in Koradi murder case arrested in Hinganghat; Two SIM cards seized | कोराडी खून प्रकरणातील आरोपीला हिंगणघाटात बेड्या; रक्ताने माखलेले दोन सिमकार्ड जप्त

कोराडी खून प्रकरणातील आरोपीला हिंगणघाटात बेड्या; रक्ताने माखलेले दोन सिमकार्ड जप्त

googlenewsNext

चैतन्य जोशी -

वर्धा -
एकतर्फी प्रेमातून कोराडीजवळच असलेल्या सुरादेवी मार्गावरील एका निर्जनस्थळी तरुणीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) नागपूर येथे घडली होती. नागपूर पोलीस तरुणीच्या मारेकऱ्याचा शोध घेत असतानाच आरोपीची हिंगणघाट येथील दोन जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्यांनी बसस्थानक परिसरातून धरपकड केली. नागपूर पोलिसांचे पथक रात्रीला हिंगणघाट येथे दाखल झाल्यावर आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

अंकित यशवंत रंधाये (२५) रा. खापरखेडा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचोली खापरखेडा येथील काजल उमराव कुकडे (२०) हिचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. तरुणीच्या गळ्यावर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या. हे हत्याकांड एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय कोराडी पोलिसांना आला आणि पोलीस तरुणीच्या मारेकऱ्याच्या शोधार्थ रवाना झाले. आरोपी अंकित रंधाये याचे मोबाईल लोकेशन हिंगणघाट शहराकडे दाखवत असल्याने पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी याची माहिती हिंगणघाट ठाण्यातील विवेक बनसोड आणि शेखर डोंगरे यांना दिली. दोघांनी रात्रीच्या सुमारास आरोपीला बसस्थानक परिसरातून अटक केली.

अन् ५० व्या मिनिटाला आरोपी जेरबंद -
नागपूर जिल्ह्यातील कोराडी नजीकच्या सुरादेवी परिसरात झालेल्या तरुणीच्या हत्याप्रकरणातील आरोपी अंकित रंधाये हा फरार होता. नागपूर पोलीस त्याच्या शोधात असतानाच नागपूर येथील गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी संपर्क साधून आरोपीचे मोबाईल टॉवर लोकेशन हिंगणघाट शहराकडे असल्याचे सांगितले. प्रशांत होळकर यांनी तत्काळ याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना दिली. गायकवाड यांनी याची माहिती हिंगणघाट ठाण्यातील कर्मचारी विवेक बनसोड आणि शेखर डोंगरे यांना दिली. त्यांनी लगेच हिंगणघाट शहरात रात्रीला गस्त घालून त्यांच्या खबऱ्यांना विचारपूस केली. अखेर एम.एच. ४० सी.ई. ७१८७ क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात असलेल्या आरोपी अंकितला दोघांनी अटक करुन नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

रक्ताने माखलेले सीमकार्ड अन् दुपट्टा जप्त -
पोलीस कर्मचारी विवेक बनसोड, शेखर डोंगरे यांनी आरोपीला अटक करुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून कागदात गुंडाळलेले दोन रक्ताने माखलेले सिमकार्ड जप्त केले. तसेच दोन दुपट्टे आणि मेमरीकार्डही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
 

Web Title: Accused in Koradi murder case arrested in Hinganghat; Two SIM cards seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.