नागपूर - कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगा शिवारात झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आणखी एक प्रचंड संतापजनक पैलू उघड झाला आहे. तिची हत्या करण्यापूर्वी नराधम आरोपी संजय देवराव पुरी (३०, रा. लिंगा, ता. कळमेश्वर) याने तिच्यावर बलात्कार केला होता, हे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हत्येसोबतच पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचेही कलम आरोपीविरुद्ध लावले असून अनुसूचित जाती - जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अॅट्रोसिटी) कलम या प्रकरणात वाढवण्यात आले आहे.
पीडित बालिका शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास आजीकडे जातो, असे सांगून घराबाहेर पडली होती. तिची आजी गावातीलच दुस-या वस्तीत राहते. आजीच्या घराकडे जात असलेला रस्ता (पांदण) शेतातून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बालिकेची आजीच पीडित बालिकेच्या आईकडे आली. त्यावेळी बालिका बेपत्ता झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर संपूर्ण गावच बालिकेचा शोध घेऊ लागले. ती कुठेच आढळली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी दुपारी कळमेश्वर ठाण्यात तक्रार नोंदविली. तिचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी बालिकेचा मृतदेह गावालगतच्या संजय भारती (रा. नागपूर) यांच्या शेतात आढळला. तिच्या मृतदेहाची अवस्था बघता तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. माहिती कळताच पोलिसांचा ताफा तेथे धडकला आणि पोलिसांनी तासाभरातच आरोपी संजय पुरीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रविवारी सायंकाळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली. तर, बालिकेचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा निष्कर्ष नोंदवला. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारी या संबंधाने पत्रकारांना माहिती देताना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी हत्येसोबतच पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचे कलम वाढवले असून, अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अॅट्रोसिटी) कलम या गुन्ह्यात लावण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत त्यांनी या संबंधाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. जनभावना तीव्र, प्रचंड बंदोबस्त अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त आगीसारखे सर्वत्र पसरले असून, कळमेश्वर तालुक्यात या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला. आजुबाजुच्या गावातील नागरिकांनी लिंगा आणि कळमेश्वरात मोठ्या संख्येत धाव घेतली आहे. रविवारी रात्री लिंगा गावात कॅण्डल मार्च काढण्यात आला. तर कळमेश्वर ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांनी लिंगा तसेच कळमेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त लावला आहे. आरोपीला पोलिसांनी अतिशय गोपनिय पद्धतीने कोर्टात हजर करून त्याचा १३ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे.