हिंगोली: एका अल्पवयीन मुलीला शारीरिक संबंधाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नांदेडला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. अत्याचारित मुलीच्या जबाबावरून एका तरुणाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस बाळापूर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणातील घटनेत आता वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. अपहरण प्रकरणात संशयित तीन जणावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात चौथा आरोपी हा अत्याचारित असल्याचे पुढे आले आहे.
आखाडा बाळापुर पोलीस ठाणे अंतर्गत येहळेगाव तुकाराम येथील एका अल्पवयीन मुलीस तिच्या घरून कुणीतरी पळवून नेले असल्याची तक्रार दिनांक 18 ऑगस्ट रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीत मुलीच्या पित्याने तीन जणांवर संशय व्यक्त केला होता. नवनाथ शिवा पाटील, अमोल उर्फ दुर्गेश रमेश आढाव, ज्ञानेश्वर पंडित काळे या तिघांविरुद्ध कलम 363 अन्वये गुन्हा दाखल झाला होता .सदर गुन्ह्यात पीडित असलेली मुलगी ही अल्पवयीन असून तिचे वय 16 वर्षे 10 महिने 13 दिवस एवढे होते. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली होती.
दरम्यान पीडित मुलगी आखाडा बाळापूर येथील बसस्थानका समोर पोलिसांना सापडली. त्यावेळी तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात मी स्वतःहून नांदेड येथे गेले होते. मारलेगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असलेला शुभम संजय पाटील याने मला तुला आईला पाहण्यासाठी नांदेडला बोलावले होते असे सांगितले होते. सदर पीडित मुलीला हिंगोली येथे बाल सुधारगृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान सीआरपीसी च्या कलम 164 प्रमाणे पीडित मुलीचा जबाब न्यायालयामध्ये नोंदवला. त्यावेळी दिलेल्या जबाबात सदर मुलीवर शुभम संजय पाटील याने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर बळजबरी केल्याचे समोर आले .सदर मुलीच्या बहिणीचा लग्न सोहळा सुरू असताना शुभम पाटील याची ओळख झाली. तेव्हापासून ते एकमेकांना फोनवर बोलत असत. लग्नानंतरही येहळेगाव येथील राहत्या घरी तो तरूण येत असे. त्यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आले.
बहिण आजारी असताना ती बहिणीच्या गावी गेली असता तेथेही तो तरुण तीन दिवस राहण्यासाठी आला होता. त्यावेळीही तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी पीडित मुलीला कल्पना न देता शारीरिक संबंधाची व्हिडिओ शूटिंग केली. त्यानंतर दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी शुभम पाटील हा येहळेगाव येथील तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ येऊन तिला बोलवून घेतले .तू माझ्यासोबत नांदेडला चल. तू आली नाही तर मी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करील अशी धमकी दिली. या धमकीला घाबरुन त्याच्या दुचाकीवर बसून ती नांदेडला गेली. नांदेड येथे नमस्कार चौक येथे असलेल्या लॉजवर तो तिला घेऊन गेला. तिथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जबरदस्ती करून तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यानच्या काळात मुलीच्या कुटुंबियांनी आखाडा बाळापुर पोलीस ठाणे गाठून मुलीला कुणीतरी पळवून नेले असल्याचे तक्रार दाखल केली होती. ही बाब शुभमला समजली. त्यावेळी मुलीला धमकी देऊन पोलीस माझ्याकडे चौकशी करतील. तू तुझ्या- माझ्या संबंधाबद्दल कोणालाही काही सांगू नकोस .जर तू काही सांगितले तर व्हिडिओ सर्वत्र पसरविण. तुझ्या घरच्यांना त्रास देईल .उध्वस्त करील अशा धमक्या दिल्या. त्यामुळे सदर पीडितेने बाळापूरला आल्यानंतरही संबंधाबाबत काही सांगितले नाही. न्यायाधीशाच्या पुढे दिलेल्या जबाबानुसार बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी शुभम संजय पाटील याच्याविरुद्ध सदर गुन्ह्यातील कलम 376 ( 2 ),(एन ) भा. द. वि. व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2012 च्या कलम 4 ,12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे .या प्रकरणी ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आच्युत मुपडे यांनी तातडीने सदर तरुणास अटक केली आहे.
आरोपीला अटक करून हिंगोली येथे विशेष न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावले आहेत .याप्रकरणी अधिक तपास करण्यात येणार असून पोलीस कोठडी दरम्यान प्रकरणाला आणि घटनेला वाचा फुटणार असल्याचे पी.एस.आय.अच्युत मुपडे यांनी सांगितले. दरम्यान अल्पवयीन मुलीला कुणीतरी पळवून नेण्याच्या तक्रारीत आता चांगलाच ट्विस्ट आला असून संशयित तिघांव्यतिरिक्त चौथाच आरोपी मुख्य आरोपी म्हणून पुढे आला आहे. त्यामुळे या प्रकरणात चांगलेच ट्वीस्ट निर्माण झाले आहे.