राडारोड्याची तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याला नगरसेविकेच्या पतीकडून भररस्त्यात मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 10:45 PM2021-02-03T22:45:06+5:302021-02-03T22:45:47+5:30
समाजसेवक पतीविरुद्ध येरवडा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल
येरवडा - रस्त्यावर पडलेल्या राडारोडयाची समस्या सोशल मीडियावर मांडणाऱ्या "कार्यकर्त्याला" नगरसेविकेच्या "समाजसेवक पती"ने भररस्त्यावर मारहाण केल्याची घटना येरवड्यात बुधवारी संध्याकाळी घडली. याप्रकरणी मनोज महादेव शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांचे पती डॅनियल लांडगे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा येरवडा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.
मनोज शेट्टी येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते असून येरवडा नागरिक कृती समितीचे सदस्य आहेत. परिसरातील विविध नागरि समस्यांवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधत असतात. तसेच महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार दाखल करून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.नवी खडकी परिसरातील रस्त्यावर राडारोडा पडल्याची तक्रार काही स्थानिक नागरिकांनी मनोज शेट्टी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जागेवर जाऊन समस्येची माहिती घेऊन त्याचे फोटो घेतले व महापालिकेला ऑनलाइन तक्रार दाखल करत समस्या सोडवण्याची मागणी सोशल मीडिया वरून केली.
सदरची तक्रार का केली? याचा जाब विचारण्यासाठी मनोज शेट्टी यांना लांडगे यांनी त्याच जागेवर फोन करून बोलावून घेतले. भरवस्तीत नागरिकांसमोर त्यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. अर्धा तास हा प्रकार सुरू होता. त्यानंतर शेट्टी यांनी येरवडा पोलीस स्टेशनला यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीवरून लांडगे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी डॅनियल लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान नागरी समस्यांकडे लक्ष वेधल्यामुळे लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे समर्थक दुखावले तर एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला मार खावा लागू शकतो हे या घटनेतून निदर्शनास येते. मारहाणीच्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आगामी काळात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.