अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन चांगलचं गाजत आहे. याप्रकरणी एनसीबी कसून चौकशी करत आहे. शिवाय एसीबीने ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री सारा अली खान, दीपिका पदुकोण यासारख्या अनेक बड्या कलाकारंची देखील चौकशी केली आहे. आता या जाळ्यामध्ये अभिनेता अर्जुन रामपाल देखील अडकला आहे. एनसीबीने सोमवारी त्याच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्यामुळे एनसीबीने अर्जुनला देखील समन्स पाठवलं होतं. आता एनसीबीकडून अर्जुनची चौकशी आज सकाळी ११ ते सायंकाळी ६ म्हणजेच ७ तास झाली. एनसीबीने त्याच्या ड्रायव्हरला देखील ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
अभिनेता अर्जुन रामपालला ड्रग्स प्रकरणी होणाऱ्या चौकशीचा सामना करावा लागणार आहे. याआधी एनसीबीनं अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमिट्रिएड्सचा भाऊ एगीसलोस डेमिट्रिएड्सला ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. मात्र, जामीन मिळ्यानंतर त्याला पुन्हा ताब्यात घेतलं होतं. एनसीबीच्या माहितीनुसार त्याच्याकडून चरस आणि Alprazolam नावाच्या टॅबलेट जप्त करण्यात आल्या होत्या. दरम्यान अर्जुनच्या आधी अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंगचं नाव देखील ड्रग्स प्रकरणी समोर आलं आणि त्यांना देखील चौकशीला सामोरं जावं लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अर्जुन रामपालचे नाव देखील याप्रकरणी चर्चेत होतं. अखेर एनसीबीने त्याच्या घरी छापा टाकत चौकशी सुरू केली आहे. शिवाय बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता फिरोझ नाडियाडवाला देखील ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोझ नाडियाडवालाच्या राहत्या घरी धाड टाकून ड्रग्ज जप्त केले आहेत. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडियाडवाला यांच्या घरातून 10 ग्रॅम गांजा व तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एनसीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. रविवारी फिरोज यांची पत्नी शबाना सईदला एनसीपीने अटक केली होती असून १५ हजाराच्या जातमुचलक्यावर तिची सुटका झाली आहे.