बरेली - क्राइम पेट्रोल आणि माटी की बन्नासारख्या टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री सपना सिंहच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एका नाल्यात संशयस्पाद अवस्थेत सपना सिंह यांच्या मुलाचा मृतदेह सापडला. १४ वर्षीय सागरच्या मृत्यूमुळे सपना सिंह यांना मोठा धक्का बसला आहे. सागरची हत्या करण्यात आली असून त्याला न्याय द्यावा अशी मागणी त्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी २ मित्रांना अटक केली आहे. सपना सिंह यांनी मुलाच्या मृत्यूनंतर दीड तासाहून अधिक काळ बरेली येथे आंदोलन केले, त्यानंतर मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा देऊ असं आश्वासन पोलीस प्रशासनाने त्यांना दिले. सागरच्या हत्येच्या आरोपात त्याचे मित्र अनुज आणि सनी यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. नशेच्या ओव्हर डोसमुळे सागरचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकं मृत्यू का झाला यासाठी विसरा नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, तपासात अनुज आणि सनीने सागरसोबत ड्रग्स आणि दारू प्यायल्याचे कबुल केले. ओव्हर डोसमुळे सागर बेशुद्ध पडला, त्यानंतर आम्ही घाबरलो आणि त्याला फरफटत एका शेताकडे नेले तिथे सोडून पळून गेलो असं मित्रांनी सांगितले. ८ वी शिकणारा सागर बरेलीच्या आनंद विहार कॉलनीत त्याच्या मामासोबत राहायचा. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सागरचा मृतदेह अनुज आणि सनी दोघे खेचून घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
सागर वाईट मित्रांच्या संगतीत होता. त्याला क्रिकेट खेळण्याची आवड होती, तेव्हा अनुज आणि सनीसोबत त्याची मैत्री झाली. हे दोघेही बिघडलेले होते. दोघं ड्रग्स सेवन करायचे. सुरुवातीला या दोघांनी स्वखर्चाने सागरला ड्रग्स दिले, त्यानंतर सागरच्या पैशावर दोघे ड्रग्स सेवन करत होते. हे दोघे पदवीधर होते तर सागर अल्पवयीन होता. अनुजचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत त्यामुळे सागरचा मृत्यू ड्रग्सच्या अतिसेवनामुळे झाल्याचं सांगून आरोपींना सोडणार होते. परंतु माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे असा दावा अभिनेत्री सपना सिंह यांनी करत आंदोलन केले त्यामुळे हे प्रकरण चिघळले.