व्यसनी पित्याने पोटच्या मुलालाच पाच लाखांत विकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 07:18 AM2020-09-21T07:18:13+5:302020-09-21T07:18:49+5:30
कोल्हापुरातील गंगावेशमध्ये दिगंबर जोतिराम पाटील हे आपल्या मनोरुग्ण पत्नी व दोन लहान मुलांसह राहतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. अशात कर्जबाजारी झालेल्या अन् व्यसनी बापाने चक्क आपल्या पोटच्या १२ वर्षांच्या मुलाला पाच लाखांमध्ये एका तृतीयपंथीयाला विकल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. बालकाच्या आजीने चाइल्ड लाइनकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे स्वाधीन केले.
येथील गंगावेशमध्ये दिगंबर जोतिराम पाटील हे आपल्या मनोरुग्ण पत्नी व दोन लहान मुलांसह राहतात. घरची परिस्थिती बिकट होती. दिगंबर हे व्यसनी असल्याने मुलाची आजी आनंदी चौगुले यांनी आपल्या मुलीला दोन्ही नातवांसह मे महिन्यात माजगाव (ता. पन्हाळा) येथे आपल्या घरी नेले होते. पण आजीचीही परिस्थिती बिकट असल्याने एका १२ वर्षांच्या मुलाला त्यांनी त्याच्या बापाकडे गंगावेशमध्ये सोडले. पुढे मे महिन्यात मद्यपी बापाने आपल्या त्या मुलाला साळोखेनगरमधील गजेंद्र गुंजाळ या तृतीयपंथी व्यक्तीकडे सांभाळण्यासाठी दिले.
तृतीयपंथीने मुुलाला सांभाळण्यासाठी घेताना त्याच्या बापाला पाच लाख रुपये देऊन दत्तक घेतल्याचे एका स्टॅम्पवर लिहून घेतले होते. गेला महिनाभर नातवाचा फोन न आल्याने आजीने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने आपल्या भाच्याला घेऊन चाइल्ड लाइन या हेल्पलाइनकडे तक्रार नोंदवली. शनिवारी सायंकाळी चाइल्ड लाइन या संस्थेने मुलाला ताब्यात घेऊन शहानिशा केली व नंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी सागर दाते यांच्याकडे स्वाधीन केले.
समिती आज चौकशी करणार
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सोमवारी जिल्हा बालकल्याण समिती उपस्थित राहणार आहे. त्या वेळी कागदपत्रांची तपासणी करून मुलाचा ताबा देणे तसेच गुन्हा नोंद करण्याबाबत कार्यवाही होणार आहे.