जमीर काझीमुंबई - राज्य पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याा सध्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदलीच्या प्रतिक्षेत असताना अप्पर महासंचालक संदीप बिष्णोई यांची जेमतेम साडे चार महिन्यात तीनवेळा विविध बदली करण्यात आली आहे. बारा दिवसापूर्वी त्यांची राज्य महामार्ग वाहतुक शाखेतून (हायवे ट्रफिक) नियुक्ती केली असताना आता त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदी बदली करण्यात आली आहे. गृह विभागाकडून मंगळवारी त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले.विशेष म्हणजे त्यांच्या समकक्ष दर्जाचे पाच अधिकाऱ्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ कधीच पूर्ण झाला आहे. मात्र, त्यांची बदली होण्याऐवजी बिष्णोई यांना झटपट तीन ठिकाणी बदल्या करण्यात आल्याने पोलीस वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यांना देण्यात आलेली तीनही पदे तुलनेत महत्वाची समजली जातात. एका ठिकाणी साधारणपणे दोन वर्षाचा कालावधी असताना गृह विभागाडून त्यांच्यावर दाखविण्यात आलेल्या या विशेष ‘मेहरबानी’वर वरिष्ठ अधिकाऱ्यांत चर्चा होत आहे.संदीप बिष्णोई हे १९९०च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ३० मे रोजी त्यांची राज्य राखीव दलाच्या (एसआरपी) अप्पर महासंचालकपदावरुन पोलीस मुख्यालयातील अस्थापना विभागात बदली करण्यात आली होती. पीएसआयपासून निरीक्षक दर्जापर्यतच्या बदल्या,बढत्या याविभागातून केल्या जातात. तर त्याहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्यांचे प्रस्ताव तेथून गृह विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी असलेल्या या विभागाचा पदभार बिष्णोई यांनी एक जूनला स्विकारला होता. त्यानंतर तीन महिन्यातच म्हणजे ११ आॅक्टोबरला त्यांची तेथून राज्य वाहतुक महामार्ग येथे बदली करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १२ दिवसात त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी सिडकोतील मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगांवकर यांची बदली करण्यात आली आहे. कारगावकर ११ मे २०१६ पासून सिडकोत प्रतिनियुक्तीवर होते. महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अधिनियम २०१४ बदली अधिनियमानुसार एका पदावर सरासरी दोन वर्षाचा कालावधी नमूद करण्यात आला आहे. मात्र, यातील कलम २२ च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या संमतीने बिष्णोई यांची बदली करण्यात आली.
पाच एडीजी मुदतपूर्ण होवूनही त्याचठिकाणी कार्यरतदोन वर्षे किंवा त्याहून अधिक कार्यकाळ पूर्ण झालेले अप्पर महासंचालक दर्जाचे पाच अधिकारी सध्या बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी ( २६ मे २०१६), प्रशासन विभागाच्या प्रज्ञा सरवदे (१६ मे २०१६), जीएसटी विभागातील मुख्य दक्षता अधिकारी के.के. सांरगल ( १३ मे२०१६), बी.के.सिंग (१४ मे २०१६) आणि संजयकुमार वर्मा (२७ मे २०१६) यांचा समावेश आहे.गृह सचिवांचे मौनसंदीप बिष्णोई यांची अल्पावधीत दोन ठिकाणाहून बदली करण्यामागील कारणाबाबत विचारणा करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव (गृह) सुनील पोरवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही सांगण्यास नकार दिला. त्याबाबत पाठविलेल्या मॅसेजला त्यांनी प्रतिसाद दिला नाही.