Adhir Ranjan Chowdhury: वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 09:47 PM2022-07-28T21:47:36+5:302022-07-28T21:49:00+5:30
FIR Against Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेत्याने हे भाष्य जाणूनबुजून केले असून त्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असा आरोप भाजपने केला आहे.
FIR Against Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता मध्य प्रदेशातील डिंडोरी येथे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी 'राष्ट्रपत्नी' हा शब्द चुकून वापरल्याचा युक्तिवाद भाजपने गुरुवारी फेटाळून लावला. काँग्रेस नेत्याने हे भाष्य जाणूनबुजून केले असून त्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असा आरोप भाजपने केला आहे.
काँग्रेसचे लोकसभेतील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केल्याने लोकसभेमध्ये गोंधळ उडाला आहे. भाजपाने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली असून चौधरी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. काही भाजपा नेत्यांनी चौधरी यांचे वक्तव्य माफी मागण्या लायक नसल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी संसदेचे कामकाज सुरु होताच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चौधरींविरोधात मोर्चा उघडला. काँग्रेस पक्ष आदिवासी महिलेचा सन्मान सहन करू शकत नाहीय, असे त्या म्हणाल्या. द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एका व्हिडीओमध्ये बोलताना राष्ट्राची पत्नी असा शब्द प्रयोग चौधरी यांनी केला होता. यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील टीका केली आहे. या साऱ्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
माफी मागण्याच्या मागणीवरून अधीर रंजन चौधरी यांनी माझ्याकडून चुकून राष्ट्राची पत्नी असा शब्द निघाला. एकदा चूक झाली तर मी काय करू? यावरून मला फासावर लटकवायचे असेल तर लटकवा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर सोनिया गांधी यांनी चौधरी यांनी माफी मागितल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून जेव्हापासून त्यांच्या नावाची घोषणा झालीय तेव्हापासून द्रौपदी मुर्मू काँग्रेस पक्षाच्या द्वेषाची आणि उपहासाची लक्ष्य झाल्या आहेत. काँग्रेसने त्यांना कठपुतळी असे देखील संबोधले आहे. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदाला शोभेशा आहेत, हे सत्य अजून काँग्रेसला स्विकारता आलेले नाही, अशी टीका इराणी यांनी केली.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की, चौधरी यांचे स्पष्टीकरण "अधिक आक्षेपार्ह" आहे. कारण त्यांनी आपली चूक छोटी असल्याचं सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले, 'अधीर रंजन चौधरी याला छोटी बाब म्हणत होते. केवळ अधीर रंजन चौधरी यांनीच नव्हे, तर संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अशी टिप्पणी करून राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला त्याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.