कौतुकास्पद! तीन महिन्यात या महिला पोलिसाने शोधली ७६ बेपत्ता मुलं अन् असं मिळालं प्रमोशन
By पूनम अपराज | Published: November 20, 2020 09:32 PM2020-11-20T21:32:10+5:302020-11-20T21:33:25+5:30
Police promotion :‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ या प्रोत्साहन योजनेच्या निकषांपेक्षा सीमा ढाका यांची कामगिरी अतिउत्कृष्ट ठरली आहे. फक्त तीन महिन्यांत त्यांनी ७६ मुलांची सुटका केली.
दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने फक्त तीन महिन्यांत ७६ बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतला. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल तिचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे. या उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला पोलिसाचे नाव सीमा ढाका (वय ३३) आहे. तीन महिन्यांत विशेष पदोन्नती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत. या मुलांना शोधून त्यांच्या कुटुंबियांशी भेट करून दिली आहे.
‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ या प्रोत्साहन योजनेच्या निकषांपेक्षा सीमा ढाका यांची कामगिरी अतिउत्कृष्ट ठरली आहे. फक्त तीन महिन्यांत त्यांनी ७६ मुलांची सुटका केली. समयपूर बादली पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावणाऱ्या हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका यांनी तीन महिन्यांहून कमी काळात ७६ मुलांना वाचवलं आहे. सुटका केलेल्या ७६ मुलांपैकी ५६ मुलांचे वय हे ७ ते १२ वर्षे आहे. या प्रोत्साहन योजनेंतर्गत केवळ तीन महिन्यांत बढती मिळवणाऱ्या सीमा ढाका या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत. यामुळे हेड कॉन्स्टेबल असलेल्या सीमा ढाका यांची सहाय्यक पोलीस निरिक्षक म्हणून वर्णी लागली आहे.
सीमा ढाका म्हणाल्या की, मी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा आणि पंजाब या राज्यातील मुलांना शोधून काढले आहे. बऱ्याच काळापासून अशा प्रकरणांवर मी काम करत आहे. आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्रोत्साहित केले. एक आई या नात्याने तिला कधीच वाटणार नाही की तिचं मूल तिच्यापासून दूर जावं. त्यामुळेच मुलांना वाचवण्यासाठी मी झपाटलेल्यासारखी २४ - २४ तास काम केले. सीमा ढाका यांना जुलै महिन्यांत करोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना तीन आठवडे क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम सुरु केलं होतं. सीमा ढाका या २००६मध्ये दिल्ली पोलिसांमध्ये रुजू झाल्या होत्या.
मोठं आव्हान होतं
सीमा यांना ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमध्ये एका अल्पवयीन मुलीला वाचवणं मोठं आव्हान होतं. सीमा यांच्या पथकाने होडीच्या सहाय्याने दोन नद्या पार करुन एका मुलाचा ठाव-ठिकाणा शोधून काढला. हे मूल हरवल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शोध मोहिम सुरु केली होती. त्याचबरोबर अशा मुलांची सुटका केली आहे, जे कुटुंबातील छोट्या - छोट्या भांडणानंतर आपल्या घरातून पळून जाऊन पुढे ड्रग्ज आणि दारुसारख्या व्यसनाला आहारी गेले होते. यापैकी बहुतांश मुलं ही रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपवर सापडली आहे.