नालासोपारा - उत्तर प्रदेशच्या सोनोली पोलीस ठाण्यांतर्गत गावातील १६ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण करून आणलेल्या मुलींची मंगळवारी तुळींज पोलिसांनी सुटका केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तुळींज पोलिसांनी यूपीच्या पोलिसांशी आणि अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींच्या घरच्यांशी संपर्क साधला असून ते ताब्यात घेण्यासाठी यूपीवरून निघाले आहेत.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे हे १५ दिवस सुट्टीवर असतानाही त्यांना एक माहिती मिळाली की, उत्तर प्रदेशच्या सोनोली पोलीस ठाण्यात १६ आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलींचे अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून त्या मुली नालासोपारा पूर्वेकडील रेहमत नगरमधील अभिजित यादव याने त्याच्या घरात आणून ठेवले आहे. शिवदे यांनी नालासोपारा उपविभागीय अधिकारी दत्ता तोटेवाड यांच्याशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार युवराज जावळे, महिला पोलीस वनिता बरफ आणि पोलीस सावंत यांनी एका तासाच्या आत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाड मारून दोन्ही अल्पवयीन मुलींची सुटका करून आरोपी अभिजित यादव याला अटक केले आहे. यात थोडा जरी उशीर झाला असता तर दोन्ही मुलींना आरोपी वाममार्गाला लावण्याची दाट शक्यता होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच या अल्पवयीन मुलींसोबत काही दुष्कृत्य होण्यापासून बचाव झाला आहे.
१६ वर्षीय मुलीने नालासोपारा येथील लोकेशन आईला यूपीमध्ये कळवले होते. सदर मुलिसोबत तिच्या १७ वर्षीय मैत्रिणीचे अपहरण आरोपीने केले होते. मिरा रोड येथील मुलीच्या नातेवाईकांनी संपर्क साधल्याने अपहरण झालेल्या मुलींची सुटका करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. - दत्ता तोटेवाड (उपविभागीय अधिकारी, नालासोपारा विभाग)