मांत्रिकाकडून होणार होती अघोरी पूजा; मध्य प्रदेशातील दोन अपहरणकर्ते जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:12 PM2021-09-20T21:12:38+5:302021-09-20T21:13:04+5:30

Crime News : नरबळीसाठी चेन्नईतील चिमुकल्याचे अपहरण : चिमुकला सुखरूप, नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग कारवाई

Aghori pooja was to be performed by a magician; Two kidnappers arrested in Madhya Pradesh | मांत्रिकाकडून होणार होती अघोरी पूजा; मध्य प्रदेशातील दोन अपहरणकर्ते जेरबंद

मांत्रिकाकडून होणार होती अघोरी पूजा; मध्य प्रदेशातील दोन अपहरणकर्ते जेरबंद

googlenewsNext
ठळक मुद्देट्रेन नंबर ०२६२१ च्या कोच नंबर डीएल-१ मध्ये ९ आणि १० क्रमांकाच्या बर्थवर दोन आरोपी चेन्नई तमिळनाडू येथून बसले असून, ते चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला इटारसीला घेऊन जात असल्याची माहिती चेन्नई लोहमार्ग पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलीस नियंत्र

नागपूर : अघोरी पूजेसाठी मांत्रिकाच्या सल्ल्यावरून चार वर्षीय चिमुकल्याचे तमिळनाडूतून अपहरण करून मध्य प्रदेशकडे निघालेल्या दोन भामट्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. मोनू गरीबदास केवट (वय २६, रा. कोलार महंत, ता. बरेली, जि. रायसेन) आणि शिब्बू गुड्डू केवट (२२, रा. बोरासधाट, ता. उदयपुरा, जि. रायसेन, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातून चिमुकल्याची सुटका करण्यात आली. तो सुखरूप आहे. या अपहरणकांडातील चिमुकल्याची नरबळीपूर्वीची पूजा होणार होती, अशी खळबळजनक माहिती आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याने खुद्द पोलीसही हादरले आहेत.


ट्रेन नंबर ०२६२१ च्या कोच नंबर डीएल-१ मध्ये ९ आणि १० क्रमांकाच्या बर्थवर दोन आरोपी चेन्नई तमिळनाडू येथून बसले असून, ते चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याला इटारसीला घेऊन जात असल्याची माहिती चेन्नई लोहमार्ग पोलिसांनी नागपूरच्या रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यावरून निरीक्षक आर. एल. मीना, सहायक उपनिरीक्षक सुहासिनी लादे, त्यांचे सहकारी तसेच लोहमार्ग पोलिसांच्या निरीक्षक मनीषा काशीद आपल्या सहकाऱ्यांसह फलाट क्रमांक एकवर कारवाईसाठी सज्ज झाल्या. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर येताच संबंधित कोचला पोलिसांनी चोहोबाजूने घेरून तपासणी केली. नऊ आणि दहा क्रमांकाच्या आसनावर संशयित आरोपी

चिमुकल्यासोबत बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे तसेच चिमुकल्याचा फोटो व्हाॅट्सॲपवरून चेन्नई पोलिसांना पाठविण्यात आला. अपहरण करण्यात आलेला हाच तो बालक आणि हेच आरोपी असल्याचे चेन्नई पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली.


चिमुकला आई-वडिलांच्या ताब्यात


आरोपींच्या ताब्यातील बालक अतिशय घाबरलेले होते. पोलिसांनी लगेच चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून बालकाला त्यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, तमिळनाडू (चेन्नई) पोलीस आणि चिमुकल्याचे पालक सोमवारी दुपारी नागपुरात पोहोचले. लोहमार्ग पोलिसांनी चिमुकल्याला छानसे गिफ्ट देऊन त्याच्या पालकांच्या हवाली केले. रेल्वेचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डेय तसेच लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीषा काशीद, उपनिरीक्षक विजय तायवाडे, ओमप्रकाश भलावी, सहायक फौजदार कुवर, हवालदार ऊके, नायक मिश्रा, शिपाई घुरडे, खवसे, नरूले, मोगरे तसेच महिला शिपाई नेवारे यांनी ही कारवाई केली.

तामिळनाडू पोलिसांची तत्परता


आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असून गेल्या तीन वर्षांपासून ते रोजगाराच्या निमित्ताने चेन्नईतील अंबतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. नमूद बालकाचे पालक मूळचे बिहारमधील रहिवासी असून, रोजगाराच्या निमित्ताने ते अंबतूर परिसरात राहते. आरोपी बाजुलाच राहत असल्याने या बालकाला ते कधी चॉकलेट तर कधी खाऊ घेऊन द्यायचे. त्यामुळे चिमुकला त्यांच्या अंगावर होता. बालकाच्या आईवडिलांचाही आरोपींवर विश्वास होता. त्यामुळे त्याला शनिवारी आरोपींनी सोबत नेले. तेव्हा नेहमीप्रमाणे चॉकलेट वगैरे घेऊन ते परत येतील, असे पालकांना वाटले होते. मात्र आरोपींनी विश्वासघात करून बालकाचे अपहरण केले. सायंकाळ झाली तरी ते परत आले नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या बालकाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चिमुकल्याचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच चेन्नई पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवली. रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातून आरोपी नमूद क्रमांकाच्या ट्रेनमध्ये बसल्याचे दिसून आले. त्या डब्यातील पीएनआर नंबर तपासून पोलिसांनी तातडीने सर्वत्र वायरलेस संदेश दिला. नमूद रेल्वेगाडी नागपूर मार्गे मध्य प्रदेशात जाणार असल्याचे लक्षात येताच चेन्नई पोलिसांनी नागपूर लोहमार्ग पोलिसांना माहिती कळविली आणि त्याचमुळे नागपुरात पोलिसांना अपहरणकर्त्यांना ताब्यात घेणे सहज शक्य झाले. दरम्यान, आज तामिळनाडू पोलीस नागपुरात पोहचले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी न्यायालयातून त्यांचा ट्रान्झिट रिमांड मिळवला. रात्री त्यांना चेन्नईला नेण्याची पोलिसांची तयारी होती.

मुंडन न झालेले बालक आणण्याचा मांत्रिकाचा सल्ला

आरोपींनी या अपहरणाच्या गुन्ह्याचा उद्देश प्राथमिक चौकशीत सांगितला. तो ऐकून पोलीस काही वेळेसाठी शहारले. दोनपैकी एका आरोपीला मूलबाळ नाही. त्यामुळे त्याच्या गावातील मांत्रिकाने त्याला मूलबाळ होण्यासाठी मुंडण न झालेला (केस न कापलेला) बालक पूजेसाठी आणल्यास तुला मूलबाळ होतील, असे सांगितले होते. त्यावरून आरोपीने या चिमुकल्याचे अपहरण केल्याची कबुली दिली. गावात नेल्यानंतर अघोरी पूजा किंवा नरबळीसाठी चिमुकल्याचा वापर केला जाणार होता, हे आरोपीच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याने काही क्षणासाठी पोलीसही शहारले. या कारवाईमुळे एक मोठा गुन्हा टळला, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी लोकमतला दिली.

Web Title: Aghori pooja was to be performed by a magician; Two kidnappers arrested in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.