मुंबई - १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्यानंतर नैराश्येतून कुर्ला परिसरात ४८ वर्षीय पित्याने लोकलखाली जाऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. पांचाराम रिठाडिया असं अपहृत मुलीचे वडिलांचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मात्र, पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलीचा अद्याप शोध लावलेला नाही म्हणून स्थानिकांनी कुर्ला सिग्नल रोखून धरला. तर आंदोलकांनी सायन - पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारले. प्रकरण चिघळत चालले असून आंदोलकांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांना मारहाण केली आहे. तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जात आहे.
कुर्ला येथील ठक्कर बापा कॉलनी पांचाराम रिठाडिया हे मागील दोन मुले, मुलगी आणि पत्नीसोबत रहात होते. घरात एकटी मुलगी असल्यामुळे पांचाराम यांचा तिच्यावर जीव होता. लहानपणापासून इतर भावंडापैकी ते तिचे लाड जास्त करायचे. मुलगी आता काँलेजला जाऊ लागली होती. त्यामुळे तिच्या वागणूकीत बद्दल पंचाराम यांच्या व्यतिरिक्त घरातील इतर सदस्यांना जाणवत होता. वारंवार चोरून मोबाइलवर बोलणे, कॉलेजहून उशिरा येणे हे सर्वांनी हेरल होतं. मात्र पांचाराम यांचा मुलीवर असलेल्या विश्वासामुळे त्यांनी ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेतली नाही. काही महिन्यांपूर्वी त्याची १७ वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम याने नेहरूनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी गेल्यामुळे पांचाराम हे दुखी होते. मात्र, पोलिसांना मुलीचा थांगपत्ता लागला नाही. अखेर टोकाचे पाऊल उचलले. पांचाराम यांनी हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वेस्थानकजवळ धावत्या लोकलखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली. या घटनेने पडसाद आता उमटू लागले आहे. संतप्त स्थानिकांनी सायन - पनवेल महामार्ग रोखला आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत.
चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीची प्रक्रिया सुरु
नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून निघालेली अंत्ययात्रा चेंबुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरशी बाप्पा चौक येथे आल्यानंतर त्यातील काही लोकांनी चौकात रस्त्यात बसून रस्ता रोको करू लागले. त्यांना पोलीसांनी विरोध केला असता त्यातील काही लोकांनी प्रक्षोभक होवून पोलीसांवर हल्ला केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झाले. त्यावेळी आवश्यकता भासल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला असल्याची माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची देखील माहिती चेंबूर पोलिसांनी दिली.