नालासोपारा : गुजरात राज्यात अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या एका ३५ वर्षीय सराईत आरोपीला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नालासोपाऱ्यातून रविवारी दुपारी राहत्या घरातून अटक केली आहे. त्याला अटक केल्यावर त्याच्या घरच्यांनी गोंधळ घातल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यावर घटनास्थळी तुळिंज पोलीस गेले. पोलिसांनी लोकांना शांत करून आरोपीला तुळिंज पोलीस ठाण्यात आणल्यावर रीतसर नोंद करून अहमदाबाद पोलीस घेऊन गेले आहे.
नालासोपाऱ्याच्या एव्हरशाईन सिटी येथील रश्मी गार्डन बिल्डिंगमध्ये परिवारासह राहणाऱ्या मनीष ऊर्फ राजू जगत नारायण सिंग (३५) याला अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी दुपारी राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेची टीम गेल्या २० ते २५ दिवसांपासून त्याच्या मागावर होती. एक अधिकारी वॉचमन बनून याच बिल्डिंगमध्ये कामाला होता. तर कोणी सफाई कामगार तर दुकानात कामाला लागून या आरोपीवर वॉच ठेवला होता. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मनीष परिवाराला भेटण्यासाठी आला होता. रविवारी दुपारी संधी मिळताच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर त्यानेही पत्नी व बहिणीच्या मदतीने आरडाओरडा करत गोंधळ घातल्यावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळाल्यावर घटनास्थळी तुळिंज पोलिसांची टीम पोहचली. तेथील लोकांना शांत करून पकडलेल्या आरोपीला तुळिंज पोलीस ठाण्यात घेऊन आले.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथे चोरी, हत्या, आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल असून त्यावेळी तो अहमदाबाद येथे राहण्यासाठी होता. तसेच याच्यावर उत्तर प्रदेश राज्यात अनेक हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे केलेले असून याच्यावर एक लाख रुपयांचे पारितोषिक यूपी पोलिसांनी ठेवले असल्याचेही कळते. नेमके या आरोपींवर कोणकोणत्या राज्यात किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती आता पोलीस गोळा करत आहे. तुळिंज पोलीस ठाण्यात याच्याविरोधात एकही तक्रार नसल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी नालासोपारा शहरात राहत असल्याने पुन्हा एकदा नालासोपाऱ्याचे नाव चर्चेत आले आहे.