लाच घेताना सापडला अजनीचा पीएसआय : नागपूर शहर पोलीस हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:30 PM2020-07-08T23:30:06+5:302020-07-08T23:31:31+5:30
अजनी पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला अॅण्टी करप्शन ब्यूरोने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बुधवारी दुपारी झालेल्या या कारवाईने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनी पोलीस ठाण्यातील एका पीएसआयला अॅण्टी करप्शन ब्यूरोने एक लाख रुपयांची लाच घेताना पकडले. बुधवारी दुपारी झालेल्या या कारवाईने शहर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. राजेशसिंह केशवसिंह ठाकूर (५६) असे आरोपीचे नाव आहे.
ठाकूर दीड वर्षापासून अजनी ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारकर्ता रेल्वेचा कंत्राटदार आहे. त्याच्याविरुद्ध अजनी ठाण्यात मागच्या वर्षी हेराफेरी केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सप्टेंबर महिन्यात त्याला अटकही झाली होती. या प्रकरणाचा तपास पीएसआय ठाकूरकडे होता. ठाकूरने त्याला २९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तक्रारीनुसार ठाकूरने अगोदर अटकेच्या नावावर तक्रारकर्त्याकडून पैसे घेतले. यानंतर पोलीस कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट देणे आणि जप्त मोबाईल परत करण्यासाठी तीन वेळा पैसे घेतले. तक्रारकर्त्यांची अजनीत जमीन आहे. या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याने ठाकूरला अतिक्रमण हटविण्याचे काम सोपविले होते. हे काम झाल्यानंतर ठाकूर तीन लाख रुपयांची मागणी करू लागला. यादरम्यान ठाकूरचा पाय फ्रॅक्चर झाला. तो तीन महिने आजारी सुटीवर गेला. सुटी संपताच कोरोनाचे संकट आले. यामुळे ते काम अडकून होते. काही दिवसांपासून ठाकूर पुन्हा तक्रारकर्त्यास पैसे मागू लागला. टाळाटाळ केल्यानंतरही ठाकूर त्याच्यावर दबाव टाकू लागला. तक्रारकर्त्याने आर्थिक तंगीचे कारण सांगितल्यावर ठाकूर एक लाख रुपयात प्रकरण संपण्यास तयार झाला. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार केली. एसीबीने केलेल्या चौकशीत तक्रार खरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याला रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली. बुधवारी ठाकूर शताब्दीनगर चौकात बंदोबस्तावर होता. त्याने तक्रारकर्त्यास शताब्दीनगर चौकात बोलावले. तिथे एक लाख रुपये घेताच त्याला अटक करण्यात आली. एसीबीने लगेच ठाकूरच्या घराचीही झडती घेतली.
या कारवाईची माहिती होताच अजनी ठाणे आणि शहर पोलीस विभागात खळबळ उडाली. ठाकूरला अटक करून अजनी ठाण्यात भ्रष्टाचारविरोधी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्रवाई अधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर अधीक्षक राजेश दुद्दलवार, मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेकी, रविकांत डहाट, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी केली.