- सचिन राऊत
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा चार हजार स्क्वेअर फुटाचा तब्बल एक कोटी रुपयांचा शासकीय भूखंड हडपणाऱ्या दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल व शेख नवेद शेख इब्राहीम अशी आरोपींची नावे असून, यामधील शेख नवेदला अटक करण्यात आली आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका महानगरपालिकेच्या मालकीची असताना हा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकल्याचे दाखविले होते. त्यानंतर खरेदी-विक्रीच्या आधारेच भूमि अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भूखंडाची नोंद शेख नवेद याच्या नावे घेतली होती; मात्र बुढन गाडेकर यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यानंतर मनपा आयुक्त व भूमि अभिलेख विभागाने ही नोंद रद्द करून भूखंड मनपाच्या नावे करण्यात आला. त्यानंतर मनपा आयुक्त यांनी या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मंगळवारी रात्री भूखंड हडप करणारा रमेशचंद्र अग्रवाल व खरेदी करणारा शेख नवेद या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अग्रवालला वाचविण्यासाठी खटाटोप!महापालिकेच्या मालकीचा भूखंड रमेशचंद्र अग्रवाल याने लीजवर घेतला. त्यानंतर बनावट दस्तावेजाद्वारे त्यानेच हा भूखंड शेख नवेद यांना विक्री केला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य दोषी अग्रवाल असताना त्याने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी हा सर्व घोटाळा शेख नवेद यांनीच केल्याचे एक प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची तयारी सुरू केली आहे; मात्र शेख नवेद यांच्यापेक्षाही मोठा दोषी रमेशचंद्र अग्रवाल असल्याने त्यांना वाचविण्यासाठी मंगळवारी दिवसभर काही लोकप्रतिनिधींनी ‘लॉबीग’ केली मात्र पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम असून ते आरोपीचा शोध घेत आहेत. दुय्यम निबंधकचे अधिकारीही रडारवर!या भूखंडाची खरेदी-विक्री झाल्याने खरेदी-विक्री व्यवहार करणारे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांवर फौजदारी कारवाई होणार आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आवश्यक दस्तावेज नसतानाही खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने येथील अधिकारीही यामध्ये सहभागी असल्याने त्यांनाही लवकरच बेड्या ठोकण्यात येणार आहेत, तर नोंद घेणारे अहिरे व काळेही पोलिसांच्या रडारवर आहेत.