नोएडा : गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील फेज-३ मध्ये असणाऱ्या हल्दीरामच्या फॅक्टरीमध्ये शनिवारी सकाळी अमोनिया गॅसची गळती झाली. यामध्ये एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीघेजण गंभीर आहेत. या प्रकरणी हल्दीरामचे मालक आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंट्रल झोनचे एसीपी तनू उपाध्याय यांनी सांगितले की य़ा प्रकरणी हल्दीरामचे मालक एमएल अग्रवाल आणि संचालक बलवीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचा भाऊ सुनिल यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.
गॅस गळतीची झळ शेजारील प्लांटलाही बसली असून तेथील तीन कर्मचारी बेशुद्ध झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिस उपायुक्त हरीश चंदर यांनी सांगितले की, खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपनीची ही फॅक्टरी आहे. चार गंभीर पैकी एकाचा उपचारावेळी मृत्यू झाला. अन्य तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
शनिवारी सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी हल्दीरामच्या प्लाँटमध्ये सहाजण काम करत होते. जवानांनी अमोनिया गॅस गळती थांबविली आणि अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.