रिसॉर्टवर आली अन् अंगठा तोडून बसली; तब्बल सात तास झाली शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 07:58 AM2023-02-20T07:58:57+5:302023-02-20T07:59:13+5:30
घाटकोपरच्या आदिनाथ नीलकंठ एनक्लेव्ह येथे राहणारी अंजना गाला (वय ७२) ही वृद्ध महिला २३ जानेवारीला सकाळी विरारच्या मांडवी रिसॉर्टमध्ये शंभरहून अधिक लोकांसोबत पिकनिकसाठी आली होती.
नालासोपारा : विरारमधील रिसॉर्टवर सहलीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचा खेळायच्या तुटलेल्या स्लाइडिंगमध्ये अडकून हाताचा अंगठा तुटल्याची घटना घडली आहे. मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या निष्णात डॉक्टरांनी सात तास शस्त्रक्रिया करून हा अंगठा पुन्हा जोडला आहे. मात्र रिसॉर्ट मालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा आरोप महिलेने केला असून, मांडवी पोलिसांनी रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापक या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपरच्या आदिनाथ नीलकंठ एनक्लेव्ह येथे राहणारी अंजना गाला (वय ७२) ही वृद्ध महिला २३ जानेवारीला सकाळी विरारच्या मांडवी रिसॉर्टमध्ये शंभरहून अधिक लोकांसोबत पिकनिकसाठी आली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या गार्डनमधील लहान मुलांच्या स्लाइडिंगजवळ त्या घसरगुंडीसाठी गेल्या असताना तेथील तुटलेल्या स्लाइडिंगवरून खाली येत असताना त्यांचे अंगठ्याचे बोट त्यात अडकून त्याचा तुकडा पडला. अपघातानंतर तुटलेला अंगठा बर्फामध्ये ठेवत त्यांना तातडीने मुंबईतील परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दुपारी चारच्या सुमारास दाखल करण्यात आले. तेथे डॉ. नीलेश सातभाई यांनी सात तास शस्त्रक्रिया करून त्यांचा तुटलेला अंगठा पुन्हा जोडला.
चार लाखांहून अधिक झाला खर्च
जवळपास चार लाखांहून अधिक खर्च त्यांना या शस्त्रक्रियेसाठी आला आहे; मात्र याबाबत रिसॉर्ट मालकांनी हात वर केले. लहान मुलांसाठी असलेल्या या स्लाइडवर आणखीही मोठा गंभीर अपघात घडू शकला असता; मात्र रिसॉर्ट मालकांनी त्या स्लाइड बदलण्याकडे आणि त्यांची डागडुजी करण्याकडे साफ दुर्लक्ष केले. अंजना गाला यांनी अखेर मांडवी पोलिस ठाण्यात रिसॉर्टचालक व व्यवस्थापक यांच्याविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
ज्या महिलेसोबत हा अपघात झाला आहे, त्यांचे पती आणि मुलगा डॉक्टर आहेत. शनिवारी तक्रार देण्यासाठी त्या परिवारासह पोलिस ठाण्यात आल्यावर रिसॉर्टमालक आणि व्यवस्थापक दोघांवर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात. चौकशी आणि सखोल तपासाअंती रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापक यांना अटक करण्यात येईल. - प्रफुल वाघ, पोलिस निरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे