Anil Deshmukh:...अन् म्हणून दुसऱ्यांदा सीबीआयचं पथक अनिल देशमुखांच्या घरी धडकलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:36 PM2021-04-25T23:36:03+5:302021-04-25T23:37:14+5:30
जुने संगणक अन् लॅपटॉपची तपासणी - प्रत्येक चिजवस्तूची बारीकसारीक नोंद
नरेश डोंगरे
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी प्रदीर्घ तपासणी तसेच चाैकशी करून निघून गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना रस्त्याने जाताना जुन्या संगणक, लॅपटॉपची आठवण झाली अन् त्याचमुळे ते पुन्हा परतले. दुसऱ्यांदा परत जाताना त्यांनी देशमुख यांच्याकडच्या जुन्या संगणक, लॅपटॉपच्या हार्डडिस्कची तपासणी करून त्या ताब्यात घेतल्या.
एनआयएच्या ताब्यात असलेला वादग्रस्त एपीआय सचिन वाझे याला १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप करणारा लेटरबॉम्ब मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी टाकला. त्यामुळे अडचणीत आलेल्या देशमुख यांची सीबीआयच्या पथकाने शनिवारी तब्बल ११ तास चाैकशी केली. सायंकाळी ६.३० ला सीबीआयचे पथक देशमुख यांच्या निवासस्थानाहून बाहेर पडले आणि लगेच अर्धा तासाने पुन्हा परतले. त्यामुळे ते कशासाठी परतले, नंतरच्या दोन तासांत त्यांनी कोणती चाैकशी केली आणि काय सोबत नेले, असे विविध प्रश्न चर्चेला आले आहेत. ‘लोकमत’ने त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी या संबंधाने संबंधित सूत्रांकडे सकाळपासून पाठपुरावा केला. मात्र, सीबीआय अथवा देशमुख यांच्याकडून कसलीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही. तथापि, खास सूत्रांकडून उपरोक्त माहिती पुढे आली. त्यानुसार, शनिवारी सकाळी ७.३० ते ७.४५च्या सुमारास २ महिलांसह १० जणांचा समावेश असलेले सीबीआयचे पथक देशमुखांच्या निवासस्थानी दाखल झाले. या पथकाने येथे सलग ११ तास चाैकशी केली. त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानाचा कानाकोपरा तपासला. प्रत्येक कपाट, लॉकर, टेबलचे ड्रॉवर, संगणक आणि मोबाइलचीही तपासणी केली. प्रत्येक कागदपत्रांचीही बारकाईने पाहणी करून त्यातून काही नोंदी केल्यानंतर देशमुख यांची चौकशी केली. हे काय आहे, ते कुठून आणले, कधी घेतले वगैरे अशा स्वरूपाची ही चाैकशी होती. ती आटोपल्यानंतर सायंकाळी ६.३० ला चार अधिकारी अर्टिगा तर ६ अधिकारी इनोव्हात बसून निघून गेले. परत जाताना अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा करताना घरात काही जुने संगणक, लॅपटॉप पडले होते, त्याची आठवण झाली. त्याचमुळे पुन्हा पाच अधिकारी एका वाहनात आले आणि त्यांनी पुन्हा त्या संगणक, लॅपटॉपची तपासणी केली. त्यांच्या हार्डडिस्क आणि अन्य काही पार्ट ताब्यात घेतले. नंतर ९.३० ला हे पथक निघून गेले.
ते पुन्हा येतील ?
दुसऱ्या वेळी जेव्हा अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी धडकले तेव्हा आता काही तरी वेगळी कारवाई होणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्याचमुळे देशमुखांच्या निकटस्थ मंडळींनी निवासस्थानासमोर जमायला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या वेळीदेखील अधिकाऱ्यांचे पथक निघून गेल्याने ते पुन्हा परत येतील, असा अंदाज बांधत मध्यरात्री १ वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह अनेक जण तेथे उभे होते. देशमुख काटोल दाैऱ्यावरून परतले अन् पहाटे २ नंतर गर्दी ओसरली.
‘ती’ वाहने सीबीआयचीच
सीबीआयचे अधिकारी ज्या वाहनातून आले तरी नवी कोरी, चकचकीत नव्हे तर पाच-दहा वर्षे जुनी असल्यासारखी दिसत होती. अर्टिगा दिल्ली पासिंगची (डीएल २ - सीएव्ही ८८९८) तर इनोव्हा (एमएच ३१- डीझेड ९९९९) नागपूर पासिंगची होती. आयपीएस अधिकाऱ्यांच्या वाहनावर प्रोटोकॉलनुसार निळा दिवा असतो. मात्र, असा कोणताही दिवा दोन पैकी एकाही गाडीवर नव्हता. त्यामुळे ही वाहने कुणाची आहेत, असा प्रश्नही पत्रकार मंडळी उपस्थित करीत होते. ही दोन्ही वाहने नागपूर आणि नवी दिल्ली सीबीआय कार्यालयाचीच असल्याचे आज स्पष्ट झाले.