Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे काय होणार? CBI चौकशीची माहिती उद्या काेर्टात सादर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:11 AM2021-04-19T06:11:47+5:302021-04-19T06:12:20+5:30
Parambir singh, Sachin Vaze: मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी वसूल करून द्यायला सांगितले होते, असा आरोप मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतून १०० कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिल्याबाबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेची (सीबीआय) प्राथमिक चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे. त्याबाबतच्या निष्कर्षची माहिती येत्या मंगळवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दर महिन्याला १०० कोटी वसूल करून द्यायला सांगितले होते, असा आरोप मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केला होता. त्याबाबत उच्च न्यायालयाने दाखल याचिकेवर १५ दिवसांत या आरोपाच्या प्राथमिक चौकशीचे आदेश दिले हाेते. त्यानंतर देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
सीबीआयने या प्रकरणात देशमुख, परमबीर सिंग, वाझेसह सर्व संबंधितांचे जबाब नोंदविले आहेत. त्याच्याआधारे प्राथमिक चौकशीचा अहवाल बनविण्यात येत असून, ताे २० एप्रिलला न्यायालयात सादर करण्यात येईल.