जॉब रॅकेट प्रकरणात आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:12 AM2019-09-20T06:12:38+5:302019-09-20T06:12:42+5:30
नोकरी लावून देण्याच्या नावाखाली २० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या आणखी एका साथीदाराला एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली २० हून अधिक जणांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या आणखी एका साथीदाराला एमआरए मार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरविंद केशवप्रसाद सिंग (४०) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो भांडुपचा रहिवासी आहे.
शहापूरचे रहिवासी असलेल्या प्रमेय भगत (२५) यांच्या तक्रारीवरून एमआरए मार्ग पोलिसांनी २०१५ मध्ये गुन्हा दाखल करीत, या प्रकरणात मर्चंट नेव्ही थर्ट आॅफिसर अण्णासाहेब महादेव लवटे (२३), मर्चंट नेव्हीतील कॅप्टन ग्लिसमन कुटीकाडन जॉन्सन उर्फ (३६), विशाल जयंत श्रॉफ (३९), आशिष तिवारी (२८) यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील २० हून अधिक जणांना नोकरीच्या नावे गंडविल्याची माहिती समोर आली. यात, त्यांनी बनावट लेटरहेडचा आधार घेतला होता.
यापाठोपाठ या टोळीतील आणखी एक साथीदार भांडुपमध्ये असल्याची माहिती मिळताच पथकाने, अरविंद केशवप्रसाद सिंग (४०) यालाही मंगळवारी अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. सिंग भांडुपच्या गणेश को-आॅप. सोसायटीत राहण्यास आहे.