कल्याण : ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यांना सदनिकेचा ताबा न देणाऱ्या हसमुख पटेल (रा. उल्हासनगर), जिग्नेश मणियार, रितू वासनिक, राज रंगनाथन (सर्व रा. कल्याण) आणि शेठ क्रियेटरस अशा पाच जणांविरोधात ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सोमवारी अजून एक गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, १० दिवसांपूर्वीच पटेलसह त्याच्या साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.पटेल ग्रुप आॅफ कंपनीचे बिल्डर पटेल याच्यासह जिग्नेश, रितू, रंगनाथन आणि शेठ क्रियेटरस यांनी पटेल कोलोसेस नावाने बिर्ला महाविद्यालयासमोर सदनिका देण्याचे प्रलोभन ग्राहकांना दाखवले होते. त्याला बळी पडलेल्या रघुनाथन नायर (६२, रा. लोकउद्यान) यांच्यासह अन्य १० जणांनी २०१२ मध्ये धनादेश तसेच रोख रक्कमेद्वारे तीन कोटी ३१ लाख रुपये देऊन सदनिका बुक केल्या. त्यानंतर रजिस्टेÑशनप्रमाणे रजिस्ट्रर करून दिलेल्या सदनिकांचे बांधकाम नियोजित वेळेत पटेल बिल्डरने पूर्ण केले नाही.याबाबत वारंवार बिल्डरकडे जाऊनही त्याच्याकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने फसवणूक झालेल्या ११ जणांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.१२ नोव्हेंबरला पटेल व त्याच्या साथीदारांविरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पटेल आपल्या साथीदारांसह आमची फसवणूक करून परागंदा झाला आहे, असा आरोप फसवणूक झालेल्या रहिवाशांनी प्रसिद्धी माध्यमांसमोरही केला होता.
पटेल बिल्डरविरोधात आणखी एक गुन्हा, ग्राहकांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:43 AM