मुंब्रा - अलीकडेच मुंब्र्यात वाहतूक पोलिसाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता नाकाबंदीदरम्यान चौकशीसाठी दुचाकी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या समर अन्सारी (21,रा.भिंवडी) या तरुणाविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.वाहतुकीची नियम तोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी मागील काही दिवसांपासून ठाणे वाहतूक शाखेच्या मुंब्रा उपविभागिय कार्यालयाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. याचअंतर्गत मंगळवारी सकाळी येथील संजय नगर परिसरात कारवाई सुरु होती. यावेळी ठाण्याच्या दिशेने ट्रिपल सीट तसेच विना हेल्मेट दुचाकीवरुन चाललेल्या अन्सारीला पोलिसांनी चौकशीसाठी थांबण्याचा इशारा केला. परंतु, थांबण्याऐवजी कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासाहेब बडगे यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. यातून वाचण्यासाठी बडगे यांनी पुढे केलेली काठी तरुणाच्या नाकाला लागल्याची माहिती मुंब्रा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश लंभाते यांनी दिली. दरम्यान, तरुणाच्या नाकावर काठीने जोरदार प्रहार करण्यात आल्याचा दावा समाजसेवक सैफ पठाण यांनी केला असून या घटनेत त्याच्या नाकाचे हाड मोडले असून त्याच्यावर गुरुवारी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती पठाण यानी दिली.
मुंब्र्यातील दुसरी धक्कादायक घटना; वाहतूक पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:13 PM