भदोही - उत्तर प्रदेशात महिलांवरील अत्याचारांचे एका मागोमाग एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. हाथरस, बलरामपूरनंतर आता भदोही येथे अल्पवयीन दलित मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजूनही बऱ्याच जिल्ह्यात बलात्काराच्या घटनांवरून लोकांमध्ये संताप आहे. या मुलीचं डोकं चिरडून निर्घुण हत्या करण्यात आली आहे. मात्र बलात्कारानंतर आमच्या मुलीला मारून टाकलं असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
ही घटना भदोही येथील गोपीगंज कोतवाली परिसरात घडली आहे. याठिकाणी चक्राजाराम तिवारीपूर गावात दुपारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर शौचालयासाठी शेतात गेली होती. पण ती खूप उशीर झाला तरी परतली नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिला शोधण्यासाठी शेताकडे गेले, तेव्हा रक्ताने माखलेला तिचा मृतदेह त्यांना दिसला. तिच्या डोक्याला जबर प्रहार करण्यात आला होता. आरोपींनी निर्दयपणे तिची हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला, पोलिसांनी घटनास्थळावर तपास सुरू केला. घटनास्थळीच फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि गुन्हे शाखेच्या पथकाला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.
भदोही पोलीस अधीक्षक राम बदन सिंह यांनी सांगितले की, बलात्कार व इतर बाबींवर पोलीस तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीचं डोकं चिरडून तिची हत्या करण्यात आली आहे. मुलीवर बलात्कार झाला आहे की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतर कळेल असं त्यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात संताप पसरला आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाच्या चौकशीत सावधपणे पाऊल टाकत आहेत. कारण याआधी हाथरस, बलरामपूर येथे दलित मुलींवर बलात्कार आणि खून केल्याच्या घटनांनी पोलीस व कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हाथरस येथील दलित मुलीचा मृतदेह जबरदस्तीने पेटवल्याने पोलीस आणि सरकारविरोधात लोकांमध्ये रोष आहे. यूपी सरकारवरही विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
घटनेबाबत महिला आयोगाने मागविले स्पष्टीकरण
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर सवर्णांनी केलेल्या बलात्काराच्या भीषण घटनेची कसून चौकशी करण्यात यावी व दोषींना अत्यंत कठोर शिक्षा करावी, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुधवारी दिले आहेत. हाथरसमधील बलात्कार प्रकरणाबाबत मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्यात येईल. दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांनी तिची जीभ कापली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, या संघटनेचे दिल्ली विभागाचे प्रमुख हिमांशू वाल्मीकी हे हाथरसला निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते व आता दोघेही बेपत्ता आहेत असा आरोप चंद्रशेखर आझाद यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.