नासाचे काम मिळाल्याची थाप मारून आर्किटेक्टची अडिच कोटीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:40 PM2020-01-10T18:40:12+5:302020-01-10T18:42:48+5:30
आर्थिक गुन्हेशाखेने तडकाफडकी कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद: नासा या अमेरिकेन अंतराळ संशोधन संस्थेकडून आर.सी.सी.रिअॅक्टर ऑफ ५ मेगावॅट पावर प्रकल्प तयार करण्याची परचेस ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील वास्तूविशारद यांना नाशिकमधील एकाने अडिच कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. याविषयी आर्थिक गुन्हेशाखेने तडकाफडकी कारवाई करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.
अभिजीत विजय पानसरे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात अॅड. नितीन रायभान भवर आणि दोन महिलांचा समावेश आहे. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, शहरातील वास्तूविशारद शरद किसनराव गवळी यांची आणि आरोपी अॅड. भवर यांची ओळख आहे. अॅड. भवरने आरोपी अभिजितसोबत ओळख करून दिली होती. तेव्हा अभिजीतने त्यांना अमेरिकन अंतराळ संसोधन संस्था नासाकडून आर.सी.सी.रिअॅक्टर आॅफ ५ मेगा वॅट पावर प्रकल्प तयार करण्याची परचेस आॅर्डर मिळाली असल्याची माहिती दिली. ही आॅर्डर पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. आॅर्डर पूर्ण झाल्यानंतर मोठा नफा मिळणार आहे. तुम्ही पैसे गुंतविल्यास तुम्हालाही चांगलाच परतावा देऊ असे अभिजीतने शरद गवळी यांना सांगितले.
यानंतर गवळी यांनी काही दिवसानंतर तुम्हाला सांगतो, असे आरोपींना सांगितले. काही दिवसानंतर आरोपींनी पुन्हा तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून पैसे गुंतविण्यासाठी विनंती केली. तक्रारदार यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी नासाचे कागदपत्रे, धनादेश, कार्यारंभ आदेश आदी बनावट कागदपत्राच्या छायांकित प्रत दिल्या. यानंतर शरद आणि त्यांच्या मित्रांनी विविध टप्प्यात अडिच कोटी रुपये आरोपींना दिले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी मात्र मुदतीनंतर तक्रारदार यांना त्यांची रक्कम परत मागितली. तेव्हा त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. आरोपींविषयी संशय आल्याने शरद आणि त्यांच्या मित्रांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन याविषयी तक्रार नोंदविली.
पोलीस आयुक्तांच्याआदेशाने आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक नवले, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे हे या अर्जाची चौकशी करीत होते. अर्जात तथ्य आढळल्याने आयुक्तांच्या आदेशाने ९ जानेवारी रोजी सिडको ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक खंडागळे, कर्मचारी गोकुळ वाघ, सुनील फेपाळे, मनोज उईके, बाळासाहेब आंधळे,नितीन घोडके, जयश्री फुके यांच्या पथकाने झटपट कारवाई करीत आरोपी अभिजीतला नाश्किा येथून अटक करून आणले.