कामशेत - पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात ठेऊन दोघांनी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाचा खुन केल्याची धक्कादायक घटना कामशेत शहरात सोमवार (दि.१६) रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन दिवसांत अटक केली आहे.याप्रकरणी कामशेत पोलीस नाईक वैभव सपकाळ यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर बाबू शेख (वय १७, रा. पंचशील कॉलनी, कामशेत) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल सादिक शेख (वय २०, रा. सहारा कॉलनी, कामशेत), अल्ताफ लतिफ सय्यद (वय २०, रा. दत्त कॉलनी) अशी खुन केलेल्या आरोपींची नावे असुन आरोपींना कामशेत पोलिसांनी अटक केली आहे.कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शेख व यातील आरोपी साहिल शेख यांच्यात पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून वादावादी झाली होती. आई वरून शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवत चिडून जाऊन यातील दोन्ही आरोपींनी संगनमताने समीर शेख यास सोमवारी ( दि. १६ ) रोजी मोटार सायकलवर बसवून कामशेत गावचे हद्दीतील जुना मुंबई पुणे महामार्गाच्या कामशेत खिंडी जवळ असलेल्या छत्री पॉईंट जवळील मुस्लिम दफन भुमीचे पाठीमागील डोंगराचे पायथ्याला वन विभागाचे जागेत नेले. आणि वस्तारा व सुरीने त्याच्यावर वार करून तसेच दगडाने डोक्यात मारून त्याचा खुन केला.हे दोन्ही आरोपी त्यानंतर फरार होते. कामशेत पोलिसांना बुधवारी आरोपी लोणावळा ग्रामीण येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने आणि मोठ्या शिताफीने या दोन्ही आरोपीना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी करीत पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पी. पी. कदम हे करत आहेत.
पैशाच्या व्यवहारावरून भांडण, मनात ठेवलेल्या रागातून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 9:21 PM
Murder : दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक
ठळक मुद्दे या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना कामशेत पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन दिवसांत अटक केली आहे. याप्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद डी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक पी. पी. कदम हे करत आहेत.