क्रिकेट खेळण्यावरून दोन गटांत सशस्त्र हाणामारी, पोलीस बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 05:17 AM2019-03-21T05:17:36+5:302019-03-21T05:18:21+5:30
क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला .
नंदुरबार - क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक करण्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंगळवारी दुपारपर्यंत संशयित आरोपींची धरपकड सुरू होती़
शहरातील हमालवाडा व माळीवाडा परिसरातील युवकांमध्ये काही दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यातून वाद झाला होता़ यातून सोमवारी रात्री दोन गटांत पुन्हा वाद झाला़ वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले़ यादरम्यान दोन्ही गटांकडून लाठ्या, दांडके, लोखंडी पाइप आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला करण्यात आला़ महाराष्ट्र व्यायामशाळेजवळ रात्री १० वाजेपासून सुरू झालेल्या या भांडणात ठिकठिकाणाहून युवकांचे जत्थे लाठ्याकाठ्या घेत हजर झाल्याने परिसरात पळापळ झाली होती़
पोलीस अधीक्षक संजय पाटील व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात तातडीने दंगा नियंत्रण पथक आणि राखीव कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाल्याने जमावावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले होते़ याप्रकरणी मंगळवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक महेश कैलास क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत जाधव, गणेश सूळ, बिरजू म्हस्के, विशाल लकडे, आकाश केदारे, योगेश शिंदे, गिरीश मराठे, सचिन जाधव, पप्पू गिरासे, शिवा येडगे, राजेश मराठे, चेतन सूळ, गजेंद्र सूळ, आकाश पाटील, सतीश राजपूत, शुभम डबडे, रवींद्र म्हस्के, गणेश पवार यांच्यासह १०० ते २०० जणांच्या अनोळखी जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नेहरू चौक : पोलिसांवर दगडफेक
शहर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन्ही गटांनी नेहरू चौक परिसरात येत पोलिसांवर दगडफेक सुरू केली़ यात परिसरातील दुकानांचे नुकसान झाले़